सातारा प्रतिनिधी
सातारा : जिल्ह्यात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या साग व रायवळ प्रजातीच्या लाकूडमालावर सातारा वनविभागाने मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मौजे उंब्रज (ता. कराड) व परिसरातील गावांमध्ये कोणताही कायदेशीर परवाना नसताना मोठ्या प्रमाणात साग व रायवळ प्रजातीच्या लाकडाची अवैध वाहतूक करून साठा करण्यात आल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या दक्षता पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ७ व ८ मार्च रोजी वनक्षेत्रपाल (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) सातारा तसेच कराड वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या संयुक्त पथकाने उंब्रज, कळंत्रेवाडी, शिवडे आणि कोर्टी या चार ठिकाणी अचानक धाड टाकली.
या कारवाईदरम्यान चार ठिकाणांहून एकूण ९८.४४९ घनमीटर इतका साग व रायवळ प्रजातीच्या १,२८३ अनगड नगांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच कळंत्रेवाडी व शिवडे येथून ६१.२७५ घनमीटर जळाऊ लाकूडही जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या साग व रायवळ लाकडाची किंमत सुमारे २५ लाख २७ हजार ८७२ रुपये असून जळाऊ लाकडाची किंमत ७९ हजार १०३ रुपये इतकी आहे.
या प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ४१ (२)(ब) अन्वये वनक्षेत्रपाल (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) सातारा यांनी तीन वनगुन्हे नोंद केले असून कराड वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी एक वनगुन्हा दाखल केला आहे. जप्त लाकूडसाठा कोठून आणण्यात आला आणि त्याची वाहतूक कुठे करण्याचा उद्देश होता, याबाबत पुढील तपास कराड वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून सुरू आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वन अधिकारी (दक्षता) कोल्हापूर संजय वाघमोडे यांच्या सहकार्याने करण्यात आली. या मोहिमेत वनक्षेत्रपाल गणेश महांगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील, वनपाल डी. डी. बोडके, आनंद जगताप तसेच वनरक्षक व फिरते पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, अवैधरित्या वृक्षतोड करून लाकडाची वाहतूक करणे हा भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार गुन्हा असून अशा प्रकरणात कारावास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. तसेच अशा वनगुन्ह्यांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाला कळवावे, असे आवाहन उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले आहे.


