मुंबई प्रतिनिधी
मुंबई : लडाखचे पर्यावरण अभ्यासक व नवोन्मेषक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. सोनम वांगचुक यांना देशद्रोही आणि चीनचे हस्तक ठरविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, देशासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप करताना सरकारला लाज वाटत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या सभेला मुंबईसह राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, उणे तापमानात देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी सोलर कॅम्प टेंट विकसित करणारे, तसेच लडाखमधील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृत्रिम ‘आइस स्तूप’ (आइस माउंटन) संकल्पना विकसित करणारे सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरविले जात आहे. वांगचुक यांनी देशासाठी काय योगदान दिले आणि केंद्र सरकारने देशाला काय दिले, याचा हिशोब एकदा व्हायलाच हवा, असे ते म्हणाले.
तरुणांना संबोधित करताना ठाकरे यांनी, आपण नेतृत्व करण्यासाठी नव्हे तर तरुणांनीच नेतृत्व स्वीकारावे, हा संदेश देण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. हा लढा केवळ सोनम वांगचुक किंवा लडाखपुरता मर्यादित नसून देशातील तरुणांच्या भविष्याचा आहे. हे सरकार केवळ ‘चंदा चोर’ नसून तरुणांचे भविष्य चोरणारे सरकार आहे. रोजगार आणि नोकऱ्यांबाबत उत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारच्या मंत्र्यांच्या राजीनाम्यांपेक्षा सरकार बदलण्याची गरज असल्याची टीकाही त्यांनी केली.
दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनाचा उल्लेख करताना, तेथील कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहता जणू युद्धाची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, तरुणांच्या असंतोषाचा उद्रेक सरकारला महागात पडेल. परीक्षांच्या वेळी अशीच तयारी केली असती, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असा टोला त्यांनी लगावला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या पाकिस्तानबाबतच्या भूमिकेचाही ठाकरे यांनी उल्लेख केला. पाकिस्तानशी चर्चा करण्याची भूमिका मांडली जाते, मग देशासाठी कार्य करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्याशी संवाद साधण्यात सरकारला अडचण काय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भाजपसोबतच्या पूर्वीच्या राजकीय संबंधांचाही उल्लेख करताना, भाजपसोबत आम्हीही होतो, त्यामुळे त्या काळातील जबाबदारी आम्हीही स्वीकारतो, असे ठाकरे म्हणाले. अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी तत्कालीन काँग्रेस सरकारने चर्चेसाठी प्रतिनिधी पाठविले होते. मात्र, सध्याच्या सरकारमध्ये संवादाची आणि माणुसकीची भावना उरलेली दिसत नाही. वांगचुक यांना बॅरिकेड्स आणि चादरींमागे लपविता येईल, पण सत्य लपविता येणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
आंदोलक तरुणांची तुलना ‘झुरळांशी’ करणाऱ्यांवरही ठाकरे यांनी निशाणा साधला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचे वयही तरुणच होते. अशा देशाच्या भविष्याला झुरळ म्हणणे योग्य नाही. देशाची मुले झुरळ असतील तर मीही झुरळ आहे. मात्र, सत्तेला गोचिडाप्रमाणे चिकटून बसलेल्यांना सत्तेबाहेर काढण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
भाषणाच्या अखेरीस ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान देत, हिंमत असेल तर तातडीने लोकसभा निवडणुका जाहीर कराव्यात. जनता आता एकत्र आली असून हा लढा केवळ दिल्लीपुरता मर्यादित राहणार नाही, तर देशभर उभा राहील. स्वातंत्र्य आणि लोकशाही वाचविण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.


