मुंबई प्रतिनिधी
मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रविवारी (१९ जुलै) विशेष निर्णय घेत राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यगृहांना सोमवारी (२० जुलै) पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली आहे. अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात न्यूयॉर्कमध्ये रंगणारा अंतिम सामना भारतात मध्यरात्रीनंतर प्रसारित होणार असल्याने फुटबॉलप्रेमींची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रीय रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय), मुंबई यांनी फिफा विश्वचषक अंतिम सामन्याच्या निमित्ताने राज्यातील खाद्यगृहे आणि रेस्टॉरंट्सना नेहमीच्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीची दखल घेत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३३ अंतर्गत राज्य सरकारने विशेष आदेश जारी केला.
सरकारने दिलेल्या आदेशानुसार, संबंधित आस्थापनांनी आतील व बाहेरील परिसरात पुरेशा प्रमाणात खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच, कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी आस्थापनाधारकांची असेल. आस्थापनात किंवा परिसरात अनुचित प्रकार अथवा गुन्हा घडल्यास संबंधित परवानाधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, वाढीव वेळेची परवानगी ही केवळ आस्थापना सुरू ठेवण्यासाठी असून ध्वनीप्रदूषणासंदर्भातील सर्व कायदे आणि सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणे अनिवार्य राहील. ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर नियमांनुसारच करावा लागणार आहे.
ही सवलत केवळ बंदिस्त जागेतील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यगृहांनाच लागू असेल. सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन आवश्यक वाटल्यास स्थानिक पोलीस प्रशासनाला ही शिथिलता नाकारण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. याशिवाय, राज्यभर योग्य बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.


