रणजित मस्के |गुन्हे वार्ताहर
सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे ऑटो रिक्षा चालवून स्टंटबाजी करणे एका २१ वर्षीय तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत संबंधित रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स (चालक परवाना) निलंबित करण्याची कारवाई देखील सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी सातारा शहरातील ‘सेव्हन स्टार’ हॉटेल समोर एक रिक्षाचालक बेदकारपणे आणि मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा पळवून स्टंट करत होता. या धोकादायक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओची गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी वाहतूक विभागाच्या अंमलदारांना या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली.
यानंतर १७ जुलै रोजी पोलिसांनी संबंधित ऑटो रिक्षा चालकाला वाहतूक शाखा सातारा शहर कार्यालयात बोलावून घेतले. व्हिडिओमधील रिक्षा आणि चालकाची कसून चौकशी करून खात्री पटवल्यानंतर, पोलिसांनी चंद्रकांत महिंद्र भिसे (वय २१ वर्षे, रा. खेड, तालुका व जिल्हा सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नव्हे तर, मोटर वाहन कायदा कलम १९०(२) अंतर्गत कारवाई करत या स्टंटबाज चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित (रद्द) करण्याचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), सातारा यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. दरम्यान, सातारा शहरातील कोणत्याही वाहनचालकाने वाहतुकीचे नियम तोडून अशा प्रकारे स्टंटबाजी किंवा बेदरकारपणे वाहन चालवल्यास त्यांच्यावर अशीच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा शहर यांच्या वतीने देण्यात आला आहे.


