कराड प्रतिनिधी
उंब्रज, ता. : कराड तालुक्यातील पेरले गावाच्या हद्दीत इंदोली पुलाजवळ पिस्तुलातून गोळीबार करून एका तरुणाला गंभीर जखमी करणाऱ्या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि उंब्रज पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अहिल्यानगर येथून अटक केली. या जलद कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाचे कौतुक होत आहे.
शुक्रवारी (ता. 17) रात्री साडेअकराच्या सुमारास पैशांच्या व्यवहारावरील वाद मिटविण्याच्या बहाण्याने संतोष शंकर घोलप (वय 37, रा. कालगाव) यांना इंदोली पुलाजवळ बोलावण्यात आले. तेथे सोमनाथ रमेश चव्हाण (रा. कालगाव) आणि योगेश सुदाम दीक्षित (रा. मसूर) यांनी त्यांना शिवीगाळ व धमकावून जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून सलग दोन गोळ्या झाडल्या. गोळ्या चुकविण्याचा प्रयत्न करत असताना त्या घोलप यांच्या दोन्ही पायांना लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अहिल्यानगर येथे लपून बसल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ अहिल्यानगर गाठून कायनेटीक चौक परिसरातील साई सूर्य हॉटेल येथे सापळा रचला. तेथून दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी उंब्रज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि उंब्रज पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पथकाचे अभिनंदन केले.


