सातारा प्रतिनिधी
सातारा : इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत एका विवाहित महिलेवर वारंवार अत्याचार करून तिचा अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतीक दिलीप वाघमारे (रा. गोडोली, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि संशयित यांची जानेवारी २०२३ मध्ये इन्स्टाग्रामवर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर हळूहळू मैत्रीत झाले आणि संशयिताने पीडितेशी सतत संपर्क ठेवण्यास सुरुवात केली. पीडित महिलेचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयिताने तिचा विश्वास संपादन करत तिला लग्नाचे आमिष दाखवले.
तक्रारीनुसार, जुलै २०२४ ते मार्च २०२६ या कालावधीत विविध ठिकाणी हा प्रकार घडला. जुलै २०२४ मध्ये संशयिताने पीडितेच्या राहत्या घरी पहिल्यांदा अत्याचार केला. त्यानंतर कास रोडवरील एका हॉटेलमध्ये नेऊन पुन्हा अत्याचार केला आणि त्या वेळी गुपचूप व्हिडिओ चित्रीकरण केले. नंतर तो व्हिडिओ दाखवत पीडितेला धमकावून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
याच व्हिडिओचा आधार घेत संशयिताने पीडितेला पाचगणी येथील सफायर मून लाईट व्हिला तसेच साताऱ्यातील देवी चौक परिसरातील एका कॅफेमध्ये नेऊन वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
संशयिताच्या सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पीडित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार करणार असल्याचे कळल्यानंतरही संशयिताने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संशयित प्रतीक वाघमारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


