सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायटी मतदारसंघातील ठराव प्रक्रियेला वेग आला असून, जावळी तालुक्यात सहकाराचे राजकारण चांगलेच तापले आहे. आपल्या गावातील सोसायटीचा ठराव स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी भाजपमधील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, दुसरीकडे माजी आमदार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या समर्थकांमध्येही जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सोसायटींचे ठराव निर्णायक ठरणार असल्याने प्रत्येक गावात राजकीय हालचालींना वेग आला आहे. संचालकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी बैठका, संपर्क मोहिमा आणि राजकीय रणनीती आखल्या जात असून, अनेक ठिकाणी ठरावांवरून संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील भाजप नेते वसंतराव मानकुमरे यांच्या हातगेघर-कावडी विविध कार्यकारी सोसायटीच्या ठरावावरून सध्या सर्वाधिक चर्चा रंगली आहे. या ठिकाणी शशिकांत शिंदे समर्थक आणि सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण गुजर यांनी स्वतःच्या गटाचा ठराव मंजूर करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने मानकुमरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. संचालकांना एकत्र ठेवण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले, अगदी त्यांना सहलीवर नेल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. मात्र, तरीही ठराव निश्चित होऊ न शकल्याने मानकुमरे यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पंचायत समितीचे उपसभापती गोरख महाडिक यांनाही आपल्या घोटेघर-रांजणी सोसायटीचा ठराव मिळवण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. राजकारणात तुलनेने नवखे असलेल्या महाडिक यांनी आक्रमकपणे मोर्चेबांधणी केली असली, तरी संचालकांचा अपेक्षित पाठिंबा मिळवण्यात त्यांना अडचणी येत आहेत. कोरमअभावी संबंधित सभाच तहकूब झाल्याने त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
माजी उपसभापती तथा भाजप नेते हणमंत पार्टे आणि विद्यमान उपसभापती दत्ता गावडे यांच्या प्रभावक्षेत्रातील खर्शी-बारामुरे सोसायटीतही भाजपला अपेक्षित यश मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. येथील ठराव भाजपविरोधी गटाकडे झुकत असल्याची चर्चा असून, त्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत.
विधानसभा निवडणूक लढवलेले अमित कदम यांनाही मेढा सेंटर सोसायटीचा ठराव आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी ज्ञानदेव रांजणे यांच्या विचारांचे संचालक संख्याबळात वरचढ असल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे कदम यांच्यासमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे.
एकूणच जावळी तालुक्यात अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांना स्वतःच्या नावाचा ठराव मिळवताना संचालकांकडून परखड विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील राजकारणाला चांगलीच धार आली असून, प्रत्येक ठरावाला प्रतिष्ठेची लढत प्राप्त झाली आहे.
दरम्यान, या संपूर्ण ठराव प्रक्रियेवर राज्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे बारकाईने लक्ष असल्याचे सांगितले जात आहे. पक्षात प्रवेश करून विविध पदे मिळवलेल्या नेत्यांनी ठराव प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा गमतीजमती होऊ देऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधितांना दिल्याची चर्चा आहे. विशेषतः मोरघर आणि महिगाव सोसायटींचे ठराव पक्षाच्या अधिकृत गटाच्या बाजूनेच व्हावेत, असा सज्जड इशारा संबंधित पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
सहकार क्षेत्रातील ही चुरशीची लढत आता केवळ सोसायट्यांच्या ठरावांपुरती मर्यादित राहिलेली नसून, ती जावळी तालुक्यातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या ताकदीची आणि संघटनात्मक क्षमतेची परीक्षा ठरत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कोणत्या गटाला किती ठराव मिळतात, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


