सातारा प्रतिनिधी
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सातारा-पुसेगाव मार्गावर शनिवारी फॉर्च्यूनर आणि बोलेरो या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत १० महिला वारकरी किरकोळ जखमी झाल्या असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, वारकरी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेऊन पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत होते. सातारा-पुसेगाव मार्गावरील एका वळणावर समोरून येणाऱ्या फॉर्च्यूनर आणि बोलेरोची समोरासमोर धडक झाली. धडकेची तीव्रता मोठी असल्याने वाहनांमध्ये बसलेल्या वारकऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.
अपघातात जखमी झालेल्या १० महिला वारकऱ्यांना तातडीने स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असून किरकोळ दुखापती झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली तसेच अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अवघ्या एक दिवसापूर्वी बारामतीजवळील जेजुरी परिसरात भरधाव कारने एका वारकऱ्याला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या अपघातात विष्णू रामचंद्र पवार (वय ६७) यांचा जागीच मृत्यू झाला होता. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या पवार यांना मध्यरात्री भरधाव कारने जोरदार धडक दिली होती.
वारीच्या काळात लाखो भाविक राज्यातील विविध मार्गांवरून पंढरपूरकडे प्रस्थान करीत असताना वाहनचालकांनी अधिक दक्षता बाळगण्याची गरज आहे. प्रशासनाकडूनही वारकरी मार्गांवर वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची मागणी होत आहे.


