नागपूर प्रतिनिधी
नायलाॅन मांजावर तबब्ल दहा वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. शासन-प्रशासनाच्या एका दशकाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही बंदी कुचकामी ठरली. त्यामुळे गेल्या १५ वर्षांत राज्यात नायलॉन मांजामुळे १८२ तर, नागपुरात ३८ जणांचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
विशेष म्हणजे यात लहान मुलांपासून प्राैढांचाही समावेश आहे.
मकर संक्रांतीच्या काळात पतंग उडविणे उत्सव असला तरी साधारण: २००६ पासून पतंगबाजीसाठी नायलाॅन मांजाचा वापर वाढल्याने हा उत्सव अनेकांसाठी जीवघेणा ठरला आहे. या मांजाविराेधात किंग काेब्रा ऑर्गनायझेशन युथ फाेर्सच्या माध्यमातून अरविंदकुमार रतुडी यांच्या नेतृत्वात रस्त्यावर आणि न्यायालयात लढा दिला जात आहे. रतुडी यांनी राज्यभरात घडलेल्या घटनांचे आकडे गाेळा करून शासन, प्रशासनाला जागे करण्याचा सातत्याने प्रयत्न चालविला आहे. त्यांनी दिलेली आकडेवारी धक्कादायक आहे.
इतर कारणांची नाेंदच हाेत नाही
नायलाॅन मांजाने केवळ गळा कापून मृत्यू हाेताे असे नाही. मांजा अडकल्याने वाहनांचा अपघात हाेताे, मांजाच्या मागे धावताना इमारतीवरून पडणे, वाहनांना धडकणे अशा कारणांनी मृत्यू हाेताे. नायलाॅन मांजा पेटत्या विद्युत ताराला अडकल्याने करंट लागूनही प्राण गेले आहेत. जनावरांच्या पोटात जाऊनही मृत्यू होतो, अशा घटनांची नायलाॅन मांजाचे कारण म्हणून नाेंद हाेत नाही.
नावात बदल करून नायलॉन मांजाची विक्री
काही वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने मांजाच्या नावात नावात बदल करून विक्री करतात. मोना काइट या सारख्या नावाने या मांजाची विक्री केली जाते. हीच विक्री सायबर क्राईम सेलची डोकेदुखी ठरते आजवर बाजारपेठेत अवैधपणे विक्री होणारा ऑनलाइन मांजा आता बहुतांश ऑनलाइन ॲप, वेबसाइटवर सर्रासपणे विकला जात आहे.
परराज्यातून येतो मांजा
परराज्यातून हा माल येत असल्याचे काही वेबसाइट्स व ऑनलाइन ट्रेडिंग ॲपचा शोध घेतल्यास स्पष्ट होते. पर्यावरणप्रेमी देखील यावर गप्प आहेत. गळे कापल्यानंतर ते आंदोलन करणार का, असा प्रश्न नागपूरकरांनी केला आहे. पोलिसांची कारवाई सुरू होण्यापूर्वी शहरामध्ये सर्रासपणे नायलॉन मांजाची आयात झाली.
नायलॉन मांजा शहरात कसा?
बंदी असतानाही नायलॉन मांजा बाजारात उपलब्ध होतो, हा प्रशासनाचा नाकर्तेपणा स्पष्ट करतो. जोवर कारवाईचा बडगा उगारला जातो तोवर हा मांजा ग्राहकांच्या हातात पोहोचलेला असतो. मांजा बाजारात येऊच नये, याबाबत कोणतेही पाऊल उचलले जात नाही.ग्राहक स्वत:च नायलॉन मांजाच्या धोक्याबाबत जागृत नसल्याने ते या मांजाची मागणी विक्रेत्यांना करतात आणि विक्रेतेही पैसा कमावण्यासाठी तो उपलब्ध करवून देतात, हे विशेष.
बंदीनंतर ९५ जणांचा गेला जीव
न्यायालयाच्या बंदीनंतर २०१६ पासून राज्यात ९५ ते १०० लाेकांचा नायलाॅन मांजाने जीव घेतला. तर, ११९ लाेक गंभीर जखमी झाले किंवा अपंग झाले. कुत्री, मांजरी, माकडे, जनावरे असे प्राणीही याचे बळी ठरले. पाच वर्षांत १ हजार ६०० प्राण्यांनी जीव गमावला. तर, १३ हजार पक्ष्यांचाही बळी गेला आहे. ६ हजार ५०० हजार पक्षी जखमी झाले असून यातले ५०-६० टक्के पक्ष्यांनी प्राण गमावला असण्याची शक्यता रतुडी यांनी व्यक्त केली.
नागपुरात ३८ लाेकांनी गमावला जीव
मागील १५ वर्षांत नागपुरात नायलाॅन मांजाने गळा कापल्याने ३८ लाेकांचा जीव गेला आहे. नायलाॅन मांजाने अपघाती निधनाची यात नोंद नाही. सुमारे साडेतीन हजार जण गंभीर व अतीगंभीर जखमी झाले. याशिवाय ७५० वर प्राणी आणि १ हजार ६०० पक्ष्यांनीही मांजामुळे जीव गमावला आहे.
राज्यात १५ वर्षांत १८१ बळी
नायलाॅन मांजाचा वापर वाढल्यापासून मागील १५ वर्षांत राज्यात १८१ लाेकांनी प्राण गमावला आहे. ८४ लाेक अपंग झाले. ७ हजारच्या जवळपास माणसे गंभीर, अतिगंभीर जखमी झाले आणि पाेलिस कर्मचाऱ्यांचा यात सर्वाधिक समावेश आहे. १२ हजार प्राणी आणि ४० हजारांवर पक्षी अतिगंभीर खमी झाले होते. यातील ७० ते ७५ टक्के पक्ष्यांनी प्राण गमावले असण्याची शक्यता रतुडी यांनी व्यक्त केली.


