नागपूर प्रतिनिधी
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओने सत्ताधाऱ्यांना धक्का दिला असून, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये लाखोंच्या जाडजूड नोटांच्या बंडलांमध्ये बसून एक व्यक्ती रक्कम मोजताना दिसते. दानवे यांचा दावाही व्यक्ती म्हणजे शिवसेना (शिंदे गट) चे आमदार महेंद्र दळवी.
या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे!
जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?@mieknathshinde @Dev_Fadnavis @AmitShah @BJP4Maharashtra #Moneypower #ruins #Maharashtra pic.twitter.com/WUDpmedTgo— Ambadas Danve (@iambadasdanve) December 9, 2025
दानवे यांनी व्हिडीओसोबत थेट सरकारवर लक्ष केंद्रित करत प्रश्न केला आहे
“शेतकरी कर्जमाफीसाठी पैसा नाही म्हणणाऱ्या या सरकारकडे हे पैशांचे ढीग कुठून येतात? हे आमदार कोण आणि नक्की काय करत होते?”
यासह त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
“मी तक्रार करणार” अंबादास दानवे
एबीपी माझाशी बोलताना दानवे म्हणाले,
“या व्हिडीओमध्ये मोठ्या नोटांच्या गड्या दिसतात. कोणाचे पैसे, कोणत्या कारणासाठी आणि कुठे नेले जात आहेत,हे तपासलेच पाहिजे. मी औपचारिक तक्रार करणार आहे. नाव घेण्याची गरज नाही; तपास यंत्रणांनी सत्य शोधले पाहिजे.”
“अंबादास दानवे कोणती तरी शोध मोहीम काढत आहेत का?” भरत गोगावले
शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी मात्र दानवे यांच्या आरोपांकडे उपरोधिक भाषेत पाहिले.
ते म्हणाले,
“व्हिडीओत कोण आहे, किती बंडलं आहेत, हे आम्ही अजून पाहिलेले नाही. दानवे यांच्याकडे काय खास शोध मोहीम आहे का? ते सतत तक्रारी करत राहतात. पण वस्तुस्थिती तपासणं आवश्यक आहे. सध्या त्यांच्याकडे कोणतंही पद नाही; कदाचित त्यामुळे शोध मोहिमाच चालू असेल!”
महेंद्र दळवींचे जोरदार प्रत्युत्तर : “अंबादास दानवे सुपारीबाज नेता”
दारोदार व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर महेंद्र दळवी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
“अंबादास दानवेंनी लाल टी-शर्टमधील व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दाखवावा. जर त्या व्हिडीओत मी असेन, तर मी तत्काळ आमदारकीचा राजीनामा देईन,” असा दळवींचा दावा.
त्यांनी पुढे म्हटले
“ब्लॅकमेल करणे हा अंबादास दानवे यांचा धंदा आहे. त्यांच्याकडे पद नाही, काम नाही. व्हिडीओ मॉर्फ केला आहे. कोणी सुपारी दिली तेही त्यांनी सांगावे.”
अधिवेशनात वातावरण तापणार
हिवाळी अधिवेशनातील कर्जमाफी, आंदोलने, शेतकऱ्यांच्या मागण्या अशा विषयांनी आधीच वातावरण तापले असताना या “कॅश व्हिडिओ”ने विरोधकांना नवे अस्त्र मिळाले आहे. अधिवेशनात हा मुद्दा प्रमुखतेने येणार यात शंका नाही.
सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नसली तरी विरोधकांनी हा मुद्दा भडकवण्याची पूर्ण तयारी दाखवली आहे. दरम्यान, व्हिडीओचे सत्य, त्यातील व्यक्तीची ओळख आणि पैशांचा स्त्रोत, याबद्दल पोलिस किंवा तपास संस्थांकडून पुढील हालचाली काय होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्यातील राजकारणाला ‘कॅश व्हिडीओ’चा तडाखा बसताच, हिवाळ्याच्या नागपूरात राजकीय तापमान मात्र चढू लागले आहे.


