नवी दिल्ली वृत्तसंस्था
आधार आणि पॅन ही आजच्या घडीला प्रत्येक नागरिकासाठी अत्यावश्यक ओळखपत्रे बनली आहेत. उत्पन्नाशी संबंधित कोणतेही व्यवहार असोत किंवा बँकिंग सेवा, पॅनशिवाय प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे, आधारशिवाय सरकारी योजना, आर्थिक व्यवहार तसेच अनेक सेवा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आधार–पॅन लिंकिंग अनिवार्य केले असून, ३१ डिसेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम संधी नागरिकांना देण्यात आली आहे.
मात्र, अनेक नागरिकांमध्ये अजूनही संभ्रम आहे की, जर ही लिंकिंग वेळेत केली नाही तर नेमके काय परिणाम होतील? या पार्श्वभूमीवर आधार–पॅन लिंकिंगचे महत्त्व, त्याचे परिणाम आणि प्रक्रिया जाणून घेणे आवश्यक ठरते.
लिंक न केल्यास काय अडचणी येऊ शकतात?
क्लिअर टॅक्सकडून उपलब्ध माहितीनुसार, आधार आणि पॅन लिंक न केल्यास नागरिकांना विविध आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
• आयकर विवरणपत्र (ITR) भरताना अडथळे येऊ शकतात.
• भरलेला आयकर परतावा (रिफंड) मिळण्यात विलंब किंवा अडचण निर्माण होऊ शकते.
• टीडीएस (TDS) आणि टीसीएस (TCS) जास्त दराने कपात होण्याची शक्यता असते.
• नवीन बँक खाते उघडणे कठीण होऊ शकते.
• डेबिट किंवा क्रेडिट कार्ड मिळवताना अडचणी येऊ शकतात.
• एका दिवसात बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करता येणार नाही.
• एका आर्थिक वर्षात २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक रोख व्यवहारांवर निर्बंध येऊ शकतात.
• बँक व्यवहारांवर मर्यादा येण्याची शक्यता असते.
कोणासाठी लिंकिंग बंधनकारक?
ज्यांचे आधार कार्ड १ ऑक्टोबर २०२४ पूर्वी जारी झाले आहे आणि जे आयकर भरतात, अशा सर्व करदात्यांसाठी आधार–पॅन लिंकिंग अनिवार्य आहे.
कोणाला सूट?
• काही विशिष्ट वर्गांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक नाही.
• आयकर विवरणपत्र दाखल न करणाऱ्या व्यक्ती
• जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालय या राज्यांतील रहिवासी
• ८० वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक
• भारतीय नागरिक नसलेली व्यक्ती
आधार–पॅन लिंक कसे कराल?
नागरिक आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलद्वारे सहजपणे आधार–पॅन लिंक करू शकतात.
1. आयकर ई-फायलिंगच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा.
2. ‘Link Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा.
3. आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक भरा.
4. नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका.
5. UIDAI सोबत आधार तपशील प्रमाणीकरणास संमती द्या.
6. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘पॅन यशस्वीरित्या लिंक झाला आहे’ असा संदेश दिसेल.
एसएमएसद्वारेही करता येते लिंकिंग
ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया शक्य नाही, ते एसएमएसद्वारेही आधार–पॅन लिंक करू शकतात.
नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून
UIDPAN <१२ अंकी आधार क्रमांक> <१० अंकी पॅन क्रमांक>
हा संदेश 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवावा लागतो.
नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा
आधार–पॅन लिंकिंग ही केवळ औपचारिकता नसून, भविष्यातील आर्थिक व्यवहार सुरळीत राहण्यासाठी अत्यावश्यक बाब आहे. अंतिम मुदत संपण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास बँकिंग, करभरणा आणि इतर आर्थिक व्यवहारांवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी वेळ न दवडता आधार–पॅन लिंक करून घेणे हितावह ठरणार आहे.


