सिडनी ऑस्ट्रेलिया:
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील जगप्रसिद्ध बोंडाई बीच परिसरात झालेल्या अंधाधुंद गोळीबारामुळे संपूर्ण देश हादरला आहे. ज्यू समुदायाच्या एका उत्सवादरम्यान घडलेल्या या भीषण घटनेत किमान १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या गोळीबारातून इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू माइकल वॉन थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे.
Shooting at Australia's Bondi beach:
A local deals with the active shooter, and brings him down. https://t.co/in956pXTuW https://t.co/B5ckE4h9Cl
— Sidhant Sibal (@sidhant) December 14, 2025
पर्यटकांनी गजबजलेल्या बोंडाई बीच परिसरात अचानक गोळीबार सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींनुसार, एका व्यक्तीने हातातील बंदुकीतून बेछूट गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्ये एका नागरिकाने प्रसंगावधान राखत गोळीबार करणाऱ्याला धक्का देत त्याच्याकडील बंदूक हिसकावून घेतल्याचे दिसते. त्यानंतर झालेल्या झटापटीत पुढील गोळीबार थांबवण्यात आल्याचे व्हिडीओत स्पष्ट होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या घटनेनंतर पोलीस व आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. न्यू साऊथ वेल्स एम्ब्युलन्स सेवेनुसार, १३ जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये सर्व ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत की परदेशी नागरिकही आहेत, याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. दहशतवादी हल्ला की वैयक्तिक वादातून घडलेली घटना, याबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीजी यांनी या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. “सिडनीसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात अशी घटना घडणे अत्यंत धक्कादायक आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. नागरिकांनी शांतता राखावी आणि तपास यंत्रणांना सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच, “पोलीस व सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी सर्वोतोपरी प्रयत्न करत असून सर्वसामान्यांचे प्राण वाचवणे हेच सर्वोच्च प्राधान्य आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या घटनेमुळे ऑस्ट्रेलियातील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, बोंडाई बीचसारख्या पर्यटनस्थळी झालेल्या गोळीबाराने जागतिक पातळीवरही खळबळ उडवली आहे.


