आजच्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
नागपूर प्रतिनिधी
राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींनी बुधवारी वेग पकडला. विधानभवनातील चर्चांपासून अर्थविश्व, परराष्ट्र धोरण, सांस्कृतिक क्षेत्र आणि बाजारपेठांपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे निर्णय व घडामोडी घडल्या. दिवसातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा
लाडकी बहीण योजनेत मानधनवाढ योग्य वेळी – उपमुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन
लाडकी बहीण योजनेतील मानधन २१०० रुपये करण्याचा प्रस्ताव योग्य वेळी विचारात घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत स्पष्ट केले. आतापर्यंत पावणेदोन कोटी महिलांनी eKYC पूर्ण केले असून अंतिम मुदत ३१ डिसेंबर निश्चित आहे.
योजनेत ५,१३६ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत विरोधकांनी श्वेतपत्रिकेची मागणी केली आणि सभात्याग केला. ८ हजार शासकीय कर्मचाऱ्यांनी नियम मोडून लाभ घेतल्याचे आणि ४ लाख लाभार्थ्यांची फेर पडताळणी सुरू असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
ई-वाहनांकडून बेकायदेशीर टोलवसुली थांबवा – विधानसभा अध्यक्षांचे कठोर निर्देश
समृद्धी महामार्ग आणि मुंबई–पुणे मार्गावर ई-वाहनांकडून चालू असलेली टोलवसुली ही राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधातील असल्याचे लक्षात आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी परिवहन विभागाला तातडीने टोलवसुली थांबवण्याचे आदेश दिले.
आमदार अनिल पाटील आणि नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. तांत्रिक कारणांमुळे अंमलबजावणीला उशीर झाल्याचे स्पष्टीकरण नगरविकासमंत्री दादा भुसे यांनी दिले. टोलमाफीची शंभर टक्के अंमलबजावणी आठ दिवसांत करण्याचे निर्देश सभापतींनी दिले आहेत.
बॉडी कॅमेरा नसल्यास ई-चलन कारवाई नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ई-चलन प्रक्रियेत वाढत्या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे अनिवार्य करण्यात येणार असून कॅमेरा नसल्यास ई-चलनची कारवाई करता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली.
खासगी मोबाईलवरून ई-चलन करण्यातील गैरप्रकारांच्या तक्रारीवरून शिवसेना (ठाकरे गट) आमदार सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईतील दुचाकी पार्किंग समस्येवर महापालिकेला डीसीआरमध्ये बदलाचा विचार करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
जुन्या ई-चलन वसुलीसाठी लोकअदालती आणि सहा महिन्यांची विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.
“पंतप्रधान ईव्हीएम नाही, लोकांची मनं हॅक करतात” – कंगना रनौत
लोकसभा अधिवेशनात निवडणूक प्रक्रियेवरील चर्चेदरम्यान मंडीच्या खासदार कंगना रनौत यांनी काँग्रेस आणि गांधी परिवारावर कठोर टीका केली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी ईव्हीएम हॅक करत नाहीत, तर लोकांची मनं हॅक करतात,” असे वादग्रस्त विधान त्यांनी केले.
राहुल गांधी यांच्यावरील त्यांच्या टीकात्मक विधानांसह बॅलेट मतदान आणि ऐतिहासिक राजनारायण खटल्याचा संदर्भ देत त्यांनी विरोधकांवर ‘तमाशा’ केल्याचा आरोप केला.
शशी थरूर यांनी ‘वीर सावरकर पुरस्कार’ नाकारला
एचआरडीएस इंडियाने जाहीर केलेला ‘वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५’ स्वीकारण्यास काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी नकार दिला आहे.
आपले नाव न विचारता घोषित करण्यात आल्यामुळे संस्थेची पद्धत ‘बेजबाबदार’ असल्याची टीका त्यांनी केली.
नवी दिल्लीतील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे कोणतेही कारण नाही, असे थरूर यांनी निवेदनात म्हटले आहे.
अमेरिकेने H-1B व्हिसा मुलाखती थांबवल्या; ८५,००० व्हिसा रद्द
अमेरिकेने H-1B व्हिसा प्रक्रियेत मोठा बदल करत जानेवारीपासून सुमारे ८५ हजार व्हिसा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. प्रभावितांमध्ये भारतीयांची मोठी संख्या आहे.
नवीन नियमांनुसार, अर्जदारांची सोशल मीडिया खाती सार्वजनिक ठेवणे बंधनकारक असून राष्ट्रीय सुरक्षेला विरोधी असलेल्या कृतींवर व्हिसा तातडीने रद्द केला जाईल.
दारू पिऊन वाहन चालवणे, चोरी आणि मारामारीसारख्या गुन्ह्यांमुळे व्हिसा रद्द होण्याच्या प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कर्मचाऱ्यांवर याचा व्यापक परिणाम अपेक्षित आहे.
चांदीने सर्वकालीन उच्चांक गाठला; किलोला रु. 1.86 लाख
चांदीच्या किमतींनी आज अभूतपूर्व उसळी घेत ७,४५७ रुपयांच्या वाढीसह प्रति किलो १,८६,३५० रुपये हा सर्वकालीन उच्चांक गाठला.
यावर्षी चांदीत तब्बल १ लाख रुपयांची वाढ झाली आहे.
सोनेही ११६ रुपयांनी वाढून १,२८,०९० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले.
शेअर बाजारात तिसऱ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स २७५ अंकांनी खालावला
कमकुवत जागतिक संकेत, फेडरल रिझर्व्हच्या धोरणांपूर्वीची अनिश्चितता आणि एफआयआयची सततची विक्री — या घटकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजार आज तिसऱ्या दिवशीही घसरले.
सेन्सेक्स २७५ अंकांनी घसरून ८४,३९१ वर, तर निफ्टी २५,७५८ वर बंद झाला.
आयटी, टेलिकॉम आणि वित्तीय समभागांमध्ये सर्वाधिक दबाव दिसून आला.


