मुंबई प्रतिनिधी
अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देणारा फुटबॉलचा महानायक लिओनेल मेस्सी सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून, या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत त्याचं भव्य स्वागत करण्यात आलं. क्रिकेटसाठी जगप्रसिद्ध असलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये मेस्सीचा प्रवेश होताच ‘मेस्सी… मेस्सी…’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. फुटबॉलचा देव क्रिकेटच्या पंढरीत अवतरल्याचा क्षण अनुभवण्यासाठी हजारो चाहत्यांनी स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात गर्दी केली होती.
Mumbai awaits for Messi Mania 🥰 #MessiInIndia pic.twitter.com/5mILJXa1En
— Doordarshan Sports (@ddsportschannel) December 14, 2025
कोलकात्यातील कार्यक्रमानंतर मुंबईत दाखल झालेल्या मेस्सीच्या उपस्थितीत राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट महादेव’चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व मेस्सीच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी मेस्सींचा सन्मान करत त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान केलं.
वानखेडेवर सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास मेस्सीची एन्ट्री झाली. मैदानात पाऊल टाकताच चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. याच वेळी भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्री याच्याशी मेस्सीची भेट झाली. दोघांनी एकमेकांना मिठी मारत शुभेच्छा दिल्या; हा क्षण उपस्थितांसाठी खास ठरला.

‘प्रोजेक्ट महादेव’ अंतर्गत राज्यातील ६० गुणवंत अंडर-१३ फुटबॉलपटूंची निवड करण्यात आली असून, या खेळाडूंना थेट लिओनेल मेस्सी यांच्याकडून तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या कार्यक्रमात मेस्सीने निवड करण्यात आलेल्या खेळाडूंना स्कॉलरशिप प्रदान केली. मुख्यमंत्री फडणवीस आणि मेस्सी यांनी एकत्रितपणे बटन दाबून या प्रकल्पाचं औपचारिक उद्घाटन केलं.

क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉलला चालना देण्यासाठी आणि खेळाच्या पायाभूत विकासासाठी ‘प्रोजेक्ट महादेव’ महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे या ६० खेळाडूंकरिता ही ऐतिहासिक संधी ठरणार असून, याच प्रकल्पातून उद्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भारतीय फुटबॉलपटू घडतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


