बीड प्रतिनिधी
बीड शहरालगत धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांची वाहने अडवून शस्त्राचा धाक दाखवत लूट करणाऱ्या कुख्यात टोळीचा बीड स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एक दरोडा आणि तीन जबरी चोरीचे असे एकूण चार गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, महामार्गावरील वाढती असुरक्षितता कमी करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे.
महामार्गावर वाहनांची वाट अडवून काचा फोडणे, धारदार शस्त्र दाखवून प्रवाशांकडील रोख रक्कम व मौल्यवान वस्तू लुटणे, असा या टोळीचा प्रकार होता. या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाढत्या गुन्हेगारीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाला आरोपींबाबत महत्त्वाचा सुगावा लागला. आरोपी कळंब (जि. धाराशिव) येथून केजच्या दिशेने कारमधून येत असल्याची माहिती मिळताच महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांना पाहताच आरोपींनी वाहन न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र सतर्क पोलिसांनी फिल्मी शैलीतील पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान काळ्या रंगाची, विनानंबर एमजी हेक्टर कार जप्त करण्यात आली. तसेच वाहनाच्या डिक्कीमधून दरोड्यासाठी वापरलेला धारदार कोयता आणि काचा फोडण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी रॉड असा शस्त्रसाठाही हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी १२ डिसेंबर रोजी तिन्ही मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये राहुल अनिल काळे (१९), विकास अनिल काळे (२१) आणि अनिल राम काळे (४०) यांचा समावेश आहे. चौकशीत त्यांनी सुनील हिरमन दशांदे, सचिन ऊर्फ आवडया राम काळे आणि बबलू शिव दशांदे (सर्व रा. मकरवाडी) या साथीदारांसह चारही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. टोळीतील उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या यशस्वी कारवाईमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये दिलासा मिळाला असून, गुन्हेगारीविरोधातील पोलिसांच्या ठोस भूमिकेचे कौतुक होत आहे.


