पुणे प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मावळसह पिंपरी-चिंचवड परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून ३० ते ३५ वयोगटातील समीर कुमार मंडळ या विवाहित आरोपीला अटक केली आहे. आरोपी मूळचा झारखंडचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शनिवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता ही चिमुकली घरातून बेपत्ता झाली होती. रात्री उशिरा आई कामावरून घरी परतल्यानंतर मुलगी घरात नसल्याचे लक्षात येताच शोधाशोध सुरू करण्यात आली. दरम्यान, रात्री दीडच्या सुमारास शिरगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मुलीचे वडील कामानिमित्त गेल्या काही दिवसांपासून पुण्यात होते, तर आई जवळच्या कंपनीत काम करत असल्याने चिमुकली अनेकदा घरात एकटी असायची. या परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपीने घराजवळील काही मीटर अंतरावर मुलीला नेऊन तिच्यावर अत्याचार करून गळा दाबून हत्या केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.
रविवारी सकाळी प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपीला ताब्यात घेतले. पुढील चौकशी सुरू असून, आरोपीविरुद्ध कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीचे कुटुंब रोजगारासाठी मावळ परिसरात वास्तव्यास होते. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.


