कराड प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार आणि राजकारणातील प्रतिष्ठेची मानली जाणारी रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड, जि. सातारा) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून कृष्णाकाठी पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. २१ जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीकडे केवळ सातारा-सांगलीच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि भाजप आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील गटाविरुद्ध माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचा गट मैदानात उतरण्याची शक्यता असून, दोन प्रमुख पॅनेलमध्ये थेट लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच दोन्ही गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने कारखाना परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, माजी सहकार मंत्री तथा माजी आमदार बाळासाहेब पाटील आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या नेत्यांचे कार्यक्षेत्र आणि प्रभावक्षेत्र कृष्णा कारखान्याच्या मतदारसंघाशी थेट जोडले गेले असल्याने त्यांच्या एका निर्णयाचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो.
५० हजारांहून अधिक सभासद ठरवणार सत्ता
या निवडणुकीत तब्बल ५० हजार २५२ सभासद मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यांच्याच मतांवर कृष्णेची सत्ता ठरणार आहे. सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांत विस्तारलेल्या कार्यक्षेत्रामुळे कृष्णा कारखान्याची निवडणूक दरवेळी राज्यातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरते. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद या निवडणुकीत असल्याचे मानले जाते.
२०२१ मध्ये भोसले गटाचा एकहाती विजय
कृष्णा कारखान्याच्या २०२१ मधील निवडणुकीत तिहेरी लढत झाली होती. विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलसमोर माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल होते. मात्र त्या निवडणुकीत सत्ताधारी भोसले गटाने २१ पैकी सर्व २१ जागांवर विजय मिळवत विरोधकांना धक्का दिला होता.
यावेळी मात्र परिस्थिती वेगळी असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या काही वर्षांत बदललेली राजकीय समीकरणे, स्थानिक पातळीवरील नाराजी, सभासदांचे प्रश्न आणि ऊसदराच्या मुद्यांमुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोणाचा प्रभाव कुठे?
कऱ्हाड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे गट प्रभावी मानले जातात. या दोन्ही नेत्यांची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. तर सांगली जिल्ह्यातील वाळवा-ईश्वरपूर मतदारसंघाचे आमदार जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील अनेक गावांमध्ये कृष्णाचे सभासद आहेत. रेठरे हरणाक्ष-बोरगाव आणि नेर्ले-तांबवे या गटांमध्ये त्यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते.
याशिवाय शिराळा मतदारसंघातील काही गावांमध्येही कृष्णाचे सभासद असून इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघातील तब्बल ३९ गावांमध्ये कारखान्याचे मतदार आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्या पलूस-कडेगाव मतदारसंघातील २१ गावांमध्ये कृष्णाचे सभासद आहेत. भारती विद्यापीठासह विविध संस्थांचे जाळेही या भागात प्रभावी आहे. त्यामुळे कदम यांची भूमिका देखील लक्षवेधी ठरणार आहे. कऱ्हाड उत्तरमधील आमदार मनोज घोरपडे आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रभावक्षेत्रातील १० गावांमध्येही कृष्णाचे सभासद आहेत.
पडद्यामागील राजकारण ठरणार निर्णायक
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत वरकरणी दोन गट आमनेसामने दिसत असले, तरी पडद्यामागील राजकीय गणिते अधिक महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक गटांचे प्रभावक्षेत्र कारखान्याच्या कार्यक्षेत्रात विभागले गेले आहे. त्यामुळे केवळ पॅनेलची ताकद पुरेशी ठरणार नसून कोणत्या नेत्याचा आशीर्वाद कोणाला मिळतो, यावरही विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.
ऊसदर, सभासदांचे प्रलंबित प्रश्न, विकासकामे, कारखान्याचे आर्थिक धोरण आणि स्थानिक राजकीय समीकरणे या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे ठरणार आहेत. त्यामुळे कृष्णा कारखान्याची ही निवडणूक केवळ सहकाराची मर्यादा ओलांडून पश्चिम महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांची रंगीत तालीम मानली जात आहे.


