पुणे प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शंभराव्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर मराठी साहित्याच्या वैचारिक आणि सांस्कृतिक प्रवासाचा मागोवा घेणारा महत्त्वाकांक्षी संशोधन प्रकल्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हाती घेतला आहे. गेल्या ९९ साहित्य संमेलनांच्या अध्यक्षीय भाषणांचे सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भातून सखोल विश्लेषण करून त्यावर आधारित संशोधन ग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाने घेतला आहे.
या संशोधन प्रकल्पाला विद्यापीठाची अधिकृत मान्यता मिळाली असून, आगामी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हा विश्लेषणात्मक संशोधन ग्रंथ प्रकाशित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. साहित्य संमेलनांच्या अध्यक्षीय भाषणांमधून काळानुसार बदललेली साहित्यदृष्टी, समाजजीवनातील परिवर्तन, भाषिक प्रश्न, सांस्कृतिक प्रवाह आणि राजकीय घडामोडींचे प्रतिबिंब अभ्यासण्याचा हा पहिलाच व्यापक प्रयत्न मानला जात आहे.
या प्रकल्पाच्या मार्गदर्शक मंडळाची बैठक नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात पार पडली. बैठकीत संशोधनाची रूपरेषा, अभ्यासाची कार्यपद्धती, विषयांचे वर्गीकरण आणि संपादन प्रक्रियेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि डॉ. अरुणा ढेरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तसेच अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश सोमण, कार्याध्यक्ष डॉ. स्वाती म्हाळंक, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. आनंद काटीकर, इतिहास संशोधक प्रा. डॉ. गणेश राऊत, प्रकल्पाच्या संपादक मंडळाचे सदस्य धनंजय कुलकर्णी, वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट आणि प्रा. योगेश बोराटे उपस्थित होते.
प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी वृत्तपत्रविद्या विभागातील श्रीकांत कांबळे आणि विशाल पवार यांची संशोधन सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षीय भाषणांचे संकलन, वर्गीकरण, संदर्भ पडताळणी आणि विश्लेषणात्मक नोंदी तयार करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
मराठी साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक व्यासपीठ नसून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे दस्तऐवजीकरण करणारे महत्त्वाचे माध्यम मानले जाते. विविध कालखंडांतील अध्यक्षीय भाषणांमध्ये तत्कालीन समाजस्थिती, भाषिक अस्मिता, शिक्षण, लोकशाही मूल्ये, स्त्री-पुरुष समानता, ग्रामीण वास्तव, जागतिकीकरण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि साहित्याची सामाजिक बांधिलकी यांसारख्या विविध विषयांवर मांडलेले विचार आजही अभ्यासकांसाठी महत्त्वाचे संदर्भ ठरतात.
याच पार्श्वभूमीवर हाती घेण्यात आलेला हा संशोधन प्रकल्प मराठी साहित्याचा वैचारिक इतिहास उलगडण्यासोबतच भावी संशोधक, विद्यार्थी आणि साहित्य अभ्यासकांसाठी संदर्भग्रंथ ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शंभराव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित होणारा हा ग्रंथ मराठी साहित्यविश्वातील ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास संशोधन प्रकल्पाशी संबंधित मान्यवरांनी व्यक्त केला आहे.


