स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मित्रानेच मित्राचा विश्वासघात करत त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाणे परिसरात उघडकीस आली आहे. दोन सख्ख्या भावांनी मिळून आपल्याच एका जवळच्या मित्राचा गळा चिरून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या निर्जन ठिकाणी फेकून दिले. या थरारक आणि अत्यंत गुंतागुंतीच्या मर्डर मिस्ट्रीची गुपीत उकल करण्यात ठाणे क्राईम ब्रँचला अखेर गुरुवारी (१६ जुलै) यश आले आहे.
ठाणे क्राईम ब्रँचच्या उल्हासनगर युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (PI) राजेश गज्जल यांना एका खबऱ्याकडून अत्यंत गोपनीय आणि महत्त्वाची माहिती मिळाली होती. रिक्षाचालक असलेले दोन सख्खे भाऊ – फैज मालिम (वय २४) आणि अल्बान मालिम (वय २३) यांनी मिळून मुंब्रा येथे राहणारा त्यांचा जवळचा मित्र अमन शेख (वय २३) याचा गळा चिरून खून केला आहे, तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे करून ते वेगवेगळ्या निर्जन स्थळी फेकले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
या खळबळजनक माहितीची गांभीर्याने दखल घेत, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या थेट आदेशानुसार क्राईम ब्रँचचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, डीसीपी अमरसिंह जाधव, आणि एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, एपीआई श्रीरंग गोसावी आणि हवालदार गणेश गावडे यांच्या पथकाने तात्काळ सापळा रचून फैज आणि अल्बान या दोन्ही आरोपी भावांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आणि हत्येचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम समोर आला. १३ जुलै २०२६ च्या रात्री दोन्ही आरोपी भावांनी मिळून अमन शेखची गळा चिरून हत्या केली. हत्या केल्यानंतर त्यांनी अमनचे मुंडके, हात आणि पाय कापून मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे त्यांनी खरडी गावातील वेगवेगळ्या निर्जन ठिकाणी फेकून दिले जेणेकरून पोलिसांना सुगावा लागणार नाही. ठाणे क्राईम ब्रँचने दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून, मृतदेहाचे उर्वरित भाग हस्तगत करण्याचे आणि या हत्येमागील मुख्य कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. या घटनेमुळे ठाणे आणि मुंब्रा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


