कराड प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील शिवसागर जलाशय परिसरातील मुनावळे येथे उभारण्यात येणाऱ्या जलपर्यटन प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. प्रकल्पाच्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार या प्रकल्पासाठी ९२ कोटींहून अधिक रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्पाअंतर्गत अत्याधुनिक नौकाविहार सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलक्रीडा, तसेच पर्यटनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा राज्याच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे पुढे येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रकल्पामुळे तारांकित हॉटेल व्यवसाय, स्थानिक पर्यटन मार्गदर्शक, वाहतूक सेवा आणि इतर पूरक व्यवसायांना चालना मिळून दुर्गम व डोंगरी भागातील नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे देसाई यांनी सांगितले.
बैठकीस पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, संचालक मंगेश जोशी, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच वन व जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
प्रकल्पाची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्यासाठी जलसंपदा, वन विभाग, जिल्हा प्रशासन आणि पर्यटन संचालनालय यांच्यात प्रभावी समन्वय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करून लालफितीचा कारभार टाळण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.


