कराड प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा, रेल्वे, उद्योग, कृषी आणि नागरी विकास क्षेत्रात गेल्या दशकभरात अभूतपूर्व गुंतवणूक झाली असून, केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे राज्याच्या विकासाला नवी गती मिळाली आहे, असा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी शनिवारी येथे केला. २०१४ ते २०२६ या कालावधीत केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने राज्यात विकासाची ‘महाक्रांती’ घडल्याचे त्यांनी सांगितले.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री अॅड. भरत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, भाजप नेते रामकृष्ण वेताळ, विक्रम पावसकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
भोसले म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र असून, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने सातत्याने आर्थिक पाठबळ दिले आहे. रस्ते, महामार्ग, रेल्वे, बंदरे, औद्योगिक वसाहती, सिंचन प्रकल्प आणि आरोग्य सुविधांमध्ये झालेली वाढ ही केंद्राच्या विकासाभिमुख धोरणांची फलश्रुती असल्याचे त्यांनी नमूद केले.
पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक
राज्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांतून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) आणि अटल सेतू यांसारख्या प्रकल्पांमुळे राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान झाली आहे. या प्रकल्पांमुळे उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
मुंबई, पुणे आणि नागपूर येथील मेट्रो प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य दिले असून, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक हमीही उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शहरी वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडून आला आहे.
रेल्वे क्षेत्राला विक्रमी निधी
महाराष्ट्राला मागील काही वर्षांत रेल्वेसाठी विक्रमी अर्थसंकल्पीय तरतूद मिळाल्याचे भोसले यांनी सांगितले. राज्यासाठी वार्षिक १५ हजार कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, मुंबई उपनगरीय रेल्वेचे आधुनिकीकरण, नवीन मार्गांचे विद्युतीकरण आणि प्रवासी सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
‘वंदे भारत’ रेल्वेगाड्यांमुळे राज्यातील प्रमुख शहरांमधील प्रवास अधिक जलद आणि सुलभ झाला असून, त्याचा पर्यटन व व्यापार क्षेत्राला सकारात्मक लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्योग आणि गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल
महाराष्ट्र हा देशातील थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करणारा अग्रगण्य राज्य असल्याचे सांगताना भोसले यांनी औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रकल्पांचा उल्लेख केला. छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटी, पालघर जिल्ह्यात उभारण्यात येत असलेले वाढवण बंदर, तसेच अमरावतीतील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क यांसारख्या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मेक इन इंडिया’, उत्पादन क्षेत्राला चालना देणाऱ्या विविध प्रोत्साहन योजना आणि औद्योगिक कॉरिडॉरच्या माध्यमातून महाराष्ट्राची औद्योगिक क्षमता अधिक मजबूत होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
कृषी व सिंचन क्षेत्राला बळ
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने विविध योजनांद्वारे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ तसेच ‘बळीराजा जलसंजीवनी’ उपक्रमांतर्गत राज्यातील २६ मोठ्या सिंचन प्रकल्पांना आर्थिक मदत देण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले.
याशिवाय ‘पीएम-किसान’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आर्थिक सहाय्य जमा होत असून, त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरी विकास आणि आरोग्य सुविधांमध्ये बदल
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत राज्यातील अनेक शहरांमध्ये मूलभूत सुविधा सुधारण्यात आल्या आहेत. नागपूर येथील एम्ससारख्या आरोग्य संस्थांमुळे उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध झाल्या असून, ‘आयुष्मान भारत’ योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उपचारांचा आधार मिळत असल्याचे भोसले यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे महाराष्ट्रातील नागरी व ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळाली असून, त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानावर दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला.
‘विकासाकडे वस्तुनिष्ठपणे पाहण्याची गरज’
राज्यात राबविण्यात आलेल्या विकासकामांकडे राजकीय पूर्वग्रहातून न पाहता वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता असल्याचे सांगत भोसले यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण करण्याऐवजी राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे महाराष्ट्र देशाच्या आर्थिक प्रगतीत अधिक प्रभावी योगदान देत असून, आगामी काळातही पायाभूत सुविधा, उद्योग, कृषी आणि सामाजिक क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यावर भर दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


