दोन परप्रांतीय महिलांची सुटका; हॉटेल मॅनेजर अटकेत
रणजित मस्के, प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, कराड तालुक्यातील तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेल शुक्रतारा येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या पथकाने आज गुरुवारी मोठी कारवाई केली. या छाप्यात दोन परप्रांतीय पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, हॉटेल मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जिल्ह्यामध्ये ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविण्यात येत आहे. यादरम्यान कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना मौजे विरवडे गावच्या हद्दीतील हॉटेल शुक्रतारा येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी या हॉटेलवर बनावट ग्राहक पाठवला. वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच पथकाने पंचांसह अचानक छापा टाकला.
या कारवाईत हॉटेल मॅनेजर सुरज मारुती सावंत (वय २७, रा. भिकवडी, ता. कडेगाव, जि. सांगली) हा दोन महिलांकडून हा व्यवसाय करून घेताना रंगेहात सापडला. पोलिसांनी दोन्ही पीडित महिलांची सुटका केली असून, मॅनेजरवर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत (PITA) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप करत आहेत.
या पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली कारवाई:
सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळे, पोलीस अंमलदार प्रविण पवार, पोलीस अंमलदार सागर बर्गे, पोलीस अंमलदार दिपक कोळी, पोलीस अंमलदार मयुर देशमुख, पोलीस अंमलदार हर्षल साळुंखे, पोलीस अंमलदार धनंजय कोळी, महिला पोलीस अंमलदार पुष्पा चव्हाण, पोलीस अंमलदार सचिन गुरव, पोलीस अंमलदार कुलदिप कोळी, पोलीस अंमलदार गणेश बाकले, पोलीस अंमलदार अभय मोरे आणि महिला पोलीस अंमलदार तेजस्वीनी मोहिते.
गुन्हेगारांची गय केली जाणार नाही!
“अवैध वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींविरुद्ध जिल्ह्याभरात अशीच कडक कारवाई यापुढेही सुरू राहील,” असा इशारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिला आहे. दरम्यान, या धाडसी कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाकडून राजश्री पाटील व त्यांच्या संपूर्ण पथकाचे कौतुक केले जात आहे.


