पुणे प्रतिनिधी
प्रशासकीय सेवेत धाडसी निर्णय, तडफदार कार्यशैली आणि वारंवार झालेल्या बदल्यांमुळे कायम चर्चेत राहिलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आयुष्यावर आधारित ‘तुकाराम’ हे चरित्रात्मक पुस्तक शुक्रवारी (१७ जुलै) पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात प्रकाशित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार शफी पठाण यांनी लिहिलेल्या या पुस्तकात मुंढे यांच्या बालपणापासून ते प्रशासकीय सेवेतील संघर्ष, धाडसी निर्णय, बदल्यांची मालिका आणि विविध वादग्रस्त घडामोडींचा सविस्तर आढावा घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले तुकाराम मुंढे यांनी अन्नभेसळ, भेसळयुक्त दूध, नियमभंग करणारी हॉटेल्स आणि अन्न व्यवसायांवर सुरू केलेल्या कठोर कारवायांमुळे राज्यभरात मोठी चर्चा रंगली आहे. त्यांच्या कारवायांचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. अशा पार्श्वभूमीवर त्यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशित होत असल्याने प्रशासकीय वर्तुळासह वाचकांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेतील टिळक स्मारक येथे होणाऱ्या प्रकाशन सोहळ्यास स्वतः तुकाराम मुंढे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून विविध क्षेत्रांतील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
लेखक शफी पठाण यांनी सांगितले की, या पुस्तकात मुंढे यांच्या जन्मापासूनचा प्रवास उलगडण्यात आला आहे. ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थिती, शिक्षणासाठी केलेला संघर्ष, अभावग्रस्त बालपण, स्पर्धा परीक्षांची तयारी, प्रशासकीय सेवेत प्रवेश आणि त्यानंतरची कारकीर्द यांचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. शासकीय सेवेत असताना त्यांना वारंवार बदल्या, राजकीय आणि प्रशासकीय दबाव, तसेच विविध प्रसंगांत आलेल्या अडचणींचाही वस्तुनिष्ठ आढावा पुस्तकात घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
विशेष म्हणजे पुस्तकाचे प्रकाशन होण्यापूर्वीच त्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात आहे. प्रकाशकांच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे एक लाख प्रतींची आगाऊ नोंदणी झाली असून प्रत्येक पुस्तकाची किंमत २५० रुपये आहे. त्यानुसार सुमारे २.५ कोटी रुपयांच्या आगाऊ बुकिंगची नोंद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रकाशनापूर्वीच इतक्या मोठ्या प्रमाणात नोंदणी झाल्याने पुस्तकाविषयीची उत्सुकता अधिक वाढली आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. भेसळविरोधी मोहिमेत त्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी समर्थकांनी त्यांच्या छायाचित्रांना दुग्धाभिषेक करून समर्थनही व्यक्त केले होते. सोशल मीडियावरही त्यांच्या कारवाईंची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.
शफी पठाण यांनी तब्बल २५ वर्षे पत्रकारितेत काम केल्यानंतर लेखन क्षेत्रात स्वतंत्र वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. एखाद्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वावर चरित्रात्मक पुस्तक लिहिण्याचा विचार मनात आला आणि त्यासाठी सर्वप्रथम तुकाराम मुंढे यांची निवड केल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यभरात तुकाराम मुंढे यांचे समर्थक मोठ्या संख्येने असल्याने या पुस्तकाकडे केवळ साहित्यकृती म्हणून नव्हे, तर एका धाडसी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या संघर्षमय प्रवासाचा दस्तऐवज म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे पुस्तकात नेमके कोणते अनुभव, निर्णय आणि पडद्यामागील घडामोडी मांडण्यात आल्या आहेत, याबाबत वाचकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.


