कराड प्रतिनिधी
कराड येथे उघडकीस आलेल्या गांजा तस्करी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट मंगळवेढा तालुक्यापर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, करणी, भूतबाधा आणि विविध अडचणी दूर करण्याचा दावा करत हजारो भक्तांचा विश्वास संपादन केलेले मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील बिरा महाराज उर्फ बिरा अंतू मासाळ हेच या प्रकरणात आरोपी म्हणून समोर आल्याने भक्तवर्गाला मोठा धक्का बसला आहे. कराड शहर पोलिसांनी या प्रकरणात बिरा महाराजांसह एकूण सात जणांना अटक केली असून, एनडीपीएस कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६६७/२०२६ अन्वये ८ जून रोजी एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब) आणि २०(ब)(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गांजा तस्करीच्या साखळीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार करून सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील विविध भागांत तपास सुरू केला. या तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आणि अखेर या रॅकेटशी संबंधित सात जणांना अटक करण्यात यश आले.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गोरख जिजाबाई पवार (वय ५६, कराड), शुभम अनिल पानसकर (वय २९, मल्हारपेठ), सोहम अशोक जाधव (वय ३६, मल्हारपेठ), रजाक उस्मान कच्ची (वय ५८, कराड), बिरा उर्फ महाराज अंतू मासाळ (वय ४३, गोणेवाडी, ता. मंगळवेढा), रामेश्वर बिरा लोखंडे (वय २७, गोणेवाडी) आणि शरद भावुसाहेब पवार (वय २७, वाकीघेरडी, ता. सांगोला) यांचा समावेश आहे.
तपासात उलगडत आहेत तस्करीचे धागेदोरे
गांजा तस्करीचे हे जाळे नेमके किती मोठे आहे, याचा शोध घेण्यासाठी कराड पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. गांजाचा पुरवठा कुठून होत होता, त्याची वाहतूक कोणाच्या माध्यमातून केली जात होती, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या चौकशीतून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तपास अधिक खोलवर जात असल्याने सातारा, सोलापूर आणि शेजारील जिल्ह्यांतील काही संशयितांवरही पोलिसांची नजर असल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी अटकसत्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘बिरा महाराज’ म्हणून मोठी ओळख
मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील बाजीबाबा देवस्थानाशी संबंधित असलेले बिरा महाराज हे परिसरात धार्मिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. अमावस्या तसेच प्रत्येक शनिवारी सायंकाळी त्यांच्या दरबाराला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असत. करणी, भूतबाधा, कौटुंबिक अडचणी, व्यवसायातील संकटे आणि वैयक्तिक समस्या दूर करण्यासाठी अनेक जण त्यांच्याकडे येत असल्याचे सांगितले जाते.
गावागावांतून तसेच शेजारील जिल्ह्यांतूनही भाविक त्यांच्या दर्शनासाठी आणि मार्गदर्शनासाठी येत असत. त्यामुळे त्यांच्याभोवती एक धार्मिक आणि आध्यात्मिक प्रतिमा निर्माण झाली होती. मात्र, त्याच व्यक्तीचे नाव गांजा तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात समोर आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
भक्तांमध्ये संताप आणि अविश्वास
बिरा महाराजांवर श्रद्धा ठेवणाऱ्या अनेक भाविकांसाठी ही घटना धक्कादायक ठरली आहे. ज्यांच्या चरणी नतमस्तक होत होतो, ज्यांच्याकडे संकटमोचक म्हणून पाहिले जात होते, त्यांच्यावरच अमली पदार्थ तस्करीचे आरोप झाल्याने भाविकांमध्ये संभ्रम, संताप आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोणेवाडी व परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, अनेक जण या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी करत आहेत. काही भक्तांनी पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढू नयेत, अशी भूमिका घेतली असली तरी अटकेच्या कारवाईमुळे धार्मिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांची भूमिका स्पष्ट
दरम्यान, कराड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने सुरू ठेवला असून, आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील कोठडीची मागणी करण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
गांजा तस्करीच्या या प्रकरणात धार्मिक प्रतिमा असलेल्या व्यक्तीचे नाव समोर आल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या तपासाकडे लागले असून, आगामी चौकशीतून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


