मुंबई प्रतिनिधी
राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस तीव्र होत असून अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा झपाट्याने वाढू लागला आहे. बहुतांश शहरांमध्ये कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून काही ठिकाणी चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग यांनी पुढील दोन दिवस राज्यात उष्णतेचा इशारा देत विविध जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत राज्यातील कमाल तापमानात साधारण दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कोकण किनारपट्टीतील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी उष्ण व आर्द्र हवामानाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. ८ आणि ९ मार्च रोजी या भागात उकाड्यासोबत आर्द्रतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भात तापमानाचा पारा चाळीशीकडे
विदर्भात उष्णतेचा सर्वाधिक प्रभाव जाणवत आहे. शनिवारी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती येथे ४०.८ अंश सेल्सिअस इतकी झाली. पुढील दोन दिवसांत अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांत तापमान चाळीशी पार जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या तिन्ही जिल्ह्यांना पुढील दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून येथे तापमान सरासरीपेक्षा सुमारे पाच अंश सेल्सिअसने अधिक राहण्याचा अंदाज आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांनी वाढून ३८ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
पुण्यात उकाड्याने नागरिक हैराण
मध्य महाराष्ट्रातही उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून सरासरीपेक्षा सुमारे दोन अंश जास्त तापमानाची नोंद होत आहे. सध्या पुण्यात कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअसदरम्यान आहे.
शनिवारी पुण्यात सुमारे ३५ ते ३६ अंश तापमानाची नोंद झाली. तर सांगली येथे ३७.४, सातारा येथे ३६.१ आणि नाशिक येथे ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महिन्याच्या अखेरीस या भागातही तापमान चाळीशी ओलांडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मराठवाड्यातही तापमानात वाढ
दरम्यान मराठवाडा प्रदेशातही गेल्या चार दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे.
शनिवारी परभणी येथे ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर धाराशिव येथे ३६.२, छत्रपती संभाजीनगर येथे ३७.६, बीड येथे ३६.६ आणि उदगीर येथे सुमारे ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्रातही तापमानात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता असून राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


