मुंबई प्रतिनिधी
अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा सात बंगला परिसरात पुनर्विकासासाठी सुरू असलेल्या इमारतीच्या तोडकामादरम्यान इमारतीचा वरचा मोठा भाग अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Mumbai demolition incident: बापरे! मुंबईत मोठी दुर्घटना टळली, नाहीतर… स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, काय घडलं? #MumbaiNews pic.twitter.com/LnF6vaGa42
— sandip kapde (@SandipKapde) March 7, 2026
माहितीनुसार, संबंधित इमारतीचे तोडकाम मागील काही दिवसांपासून सुरू होते. दरम्यान पाच-सहा दिवसांपूर्वी तोडकाम चालू असताना इमारतीचा वरचा मोठा भाग अचानक कोसळला. परिसरात घनदाट वस्ती असल्याने कोसळलेल्या अवशेषांमुळे आसपासच्या इमारतींना धोका निर्माण झाला होता. सुदैवाने त्या वेळी परिसरात कोणीही जखमी झाले नाही.
नागरिकांमध्ये अस्वस्थता
घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिसरातील अनेक इमारती एकमेकांच्या जवळ असल्याने तोडकामाच्या वेळी आवश्यक असलेल्या सुरक्षाविषयक उपाययोजना पाळल्या गेल्या नाहीत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. धूळ नियंत्रणासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याचे तसेच कामगार व नागरिकांसाठी आवश्यक सुरक्षा कवच उपलब्ध नसल्याचेही रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे केवळ कामगारांच्याच नव्हे तर परिसरातील नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रदूषणाचा मुद्दाही ऐरणीवर
मुंबईत आधीच हवेतील प्रदूषणाची पातळी वाढलेली असताना अशा प्रकारच्या अनियंत्रित तोडकामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ पसरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. “अशा पद्धतीने बेजबाबदारपणे काम करणे म्हणजे नागरिकांच्या जिवाशी खेळणे आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
महापालिकेची कारवाई
घटनेची दखल घेत मुंबई महानगरपालिकेने संबंधित तोडकामावर तातडीने स्थगिती दिली आहे. महापालिकेकडून ‘स्टॉप नोटीस’ बजावून तोडकाम प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे. नेमके कारण काय होते आणि सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन झाले का, याची चौकशी सुरू करण्यात आली असून अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेमुळे मुंबईतील विविध पुनर्विकास प्रकल्पांमधील सुरक्षा मानकांच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी तोडकाम अपरिहार्य असले तरी ते काटेकोर सुरक्षा उपायांसह आणि नियंत्रित पद्धतीने करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


