मुंबई प्रतिनिधी
मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित गोंधळाच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तब्बल 20 दिवस सरकारने बघ्याची भूमिका घेतली आणि आंदोलन आवाक्याबाहेर जात असल्याचे लक्षात येताच सोनम वांगचुक यांच्यावर कारवाई करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे गेल्या 21 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर जंतर-मंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या कारवाईच्या निषेधार्थ सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही उपोषण सुरू केले आहे.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, सोनम वांगचुक यांना पाच-सहा दिवसांत अटक होईल, अशी शक्यता आधीच व्यक्त केली जात होती आणि अखेर तसेच झाले. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नाही. त्याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाही केंद्र सरकारने दीर्घकाळ कोणतीही दखल घेतली नाही.
पुढे विविध राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. काँग्रेसकडून प्रतिनिधी आंदोलनस्थळी गेले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. सर्वच पक्षांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला असतानाही सरकारने तब्बल 20 दिवस आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतरच अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला, असा आरोप पवार यांनी केला.
सोनम वांगचुक यांना अटक झाली असली तरी आंदोलन थांबणार नाही. त्यांच्या मागण्या रास्त असून हा विषय आगामी संसदेच्या अधिवेशनातही गाजेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.


