नवी मुंबई, प्रतिनिधी
नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील एका भंगार व्यावसायिकाकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागून मारहाण व धमकावल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पूजा बनसोडे यांना तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील अन्य तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्भे परिसरातील एका भंगार व्यावसायिकाकडे पूजा बनसोडे यांनी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली होती. संबंधित व्यावसायिकाने खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर बनसोडे आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या व्यावसायिकाने तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून पूजा बनसोडे यांना अटक केली. या गुन्ह्यात सहभागी असलेले अन्य तीन आरोपी घटनानंतर फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नियुक्त केली आहेत.
शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्याला खंडणीप्रकरणी अटक झाल्याने नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास तुर्भे पोलीस करीत आहेत.


