मुंबई प्रतिनिधी
राज्यसभेच्या सात जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून अनेक आर्थिक तपशील समोर आले आहेत. या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापेक्षा त्यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे अधिक श्रीमंत असल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून महाविकास आघाडीकडून एक, तर महायुतीकडून सहा उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत पवार कुटुंबातील दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व होत असल्याने राजकीय वर्तुळातही या लढतीकडे विशेष लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी उमेदवारी दाखल केली असून महायुतीच्या तिकीटावर पार्थ पवार मैदानात उतरले आहेत. उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांतील आर्थिक तपशीलांमधून दोघांची मालमत्ता समोर आली आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची एकूण मालमत्ता ६० कोटी ७१ लाख रुपये इतकी आहे. यात ४४.७२ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता, १.२५ लाख रुपयांची रोख रक्कम, बँका व वित्तसंस्थांमधील ११.६६ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी, समभाग व म्युच्युअल फंड्समध्ये २७ कोटी रुपयांची गुंतवणूक, तसेच सोने-चांदी व इतर मौल्यवान वस्तूंमध्ये ३.८५ कोटी रुपये यांचा समावेश आहे. बारामतीतील शेती, घर व सदनिका अशा १५.९९ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचाही यात समावेश आहे. त्यांच्यावर सुमारे ४९.८४ लाख रुपयांचे दायित्व आहे.
दुसरीकडे पार्थ पवार यांची एकूण मालमत्ता ८८ कोटी ३३ लाख रुपये इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यामध्ये ११ कोटी ३५ लाख ४४ हजार रुपयांची जंगम मालमत्ता, बँका, टपाल व वित्तसंस्थांमधील ३ कोटी ६८ लाख रुपयांच्या मुदत ठेवी, समभाग व म्युच्युअल फंड्समध्ये १ कोटी १७ लाख रुपयांची गुंतवणूक, तसेच १ कोटी ३१ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आहेत. याशिवाय बारामती तालुक्यातील शेतजमीन आणि पुण्यातील घर अशा ७६ कोटी ९८ लाख रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा त्यात समावेश आहे. त्यांच्या नावावर ९२ लाख ४८ हजार रुपयांचे कर्ज असल्याची नोंदही प्रतिज्ञापत्रात करण्यात आली आहे.
या आकडेवारीनुसार पार्थ पवार यांची मालमत्ता शरद पवार यांच्या तुलनेत सुमारे २७ ते २८ कोटी रुपयांनी अधिक आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केलेल्या इतर उमेदवारांच्या तुलनेतही पार्थ पवार हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरत असल्याचे या माहितीतून स्पष्ट होते.
राज्यसभेच्या या निवडणुकीत पवार कुटुंबातील दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व आणि त्यांच्या आर्थिक स्थितीची तुलना यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


