मुंबई प्रतिनिधी
मुंबईत धक्कादायक फसवणुकीचा पर्दाफाश झाला असून, गेल्या दहा वर्षांपासून स्वतःला पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून सादर करून सेलिब्रिटी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी हा बाहेरचा व्यक्ती नसून लोहमार्ग पोलिस दलातील सहाय्यक फौजदार मोहम्मद गौस इब्राहिम खतीब असल्याचे तपासात उघड झाले आहे.
तपासानुसार, खतीब हा गेल्या दशकभरापासून आपण वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवत होता. स्वतःची विश्वासार्हता वाढवण्यासाठी तो विविध सेलिब्रिटींसोबत वावरत असे. अमिताभ बच्चन यांच्या हस्ते डॉक्टरेट स्वीकारल्याचा खोटा दावा करत त्याने अनेकांना प्रभावित केले. तसेच अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासोबतचे फोटो दाखवत तो स्वतःचे उच्चस्तरीय संबंध असल्याचा आभास निर्माण करत होता.
या बनावट प्रतिमेच्या जोरावर त्याने शासकीय व पोलीस खात्यात नोकरी मिळवून देणे, बँकांकडून मोठी कर्जे मंजूर करून देणे, न्यायालयीन किंवा इतर कारणांमुळे अडकलेले पैसे परत मिळवून देणे, अशी विविध आमिषे दाखवून अनेकांकडून लाखो रुपयांची उकळपट्टी केली. प्राथमिक तपासात शेकडो जणांची फसवणूक करून त्याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी वाढत्या तक्रारींची दखल घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपीला अटक केली. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच वरिष्ठ अधिकाऱ्याचे सोंग घेऊन दीर्घकाळ फसवणुकीचा उद्योग चालवल्याचे समोर आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी किती जणांची फसवणूक झाली, तसेच आरोपीला इतर कोणाची साथ होती का, याचा तपास सुरू आहे.


