नवी दिल्ली वृत्तसंस्था
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी पोलिसांनी वैद्यकीय उपचारांसाठी व्हीएमएमसी-सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांचे आंदोलन संपुष्टात येणार किंवा २० जुलैचा ‘संसद चलो’ मोर्चा पुढे ढकलला जाणार, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, रुग्णालयाच्या खाटेवरूनच वांगचुक यांनी देशवासीयांना संघर्षाचा नवा संदेश देत, “ही भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ आहे. कोणत्याही परिस्थितीत संसद मोर्चा यशस्वी करा,” असे आवाहन केले आहे.
Message from Sonam :
20th JULY
आज़ादी का दूसरा आन्दोलन
भय मुक्त भारत, अन्याय मुक्त भारतFreedom from injustice (Like paper leaks)
Freedom from Fear (my illegal detention)India’s 2nd FREEDOM MOVEMENT
March to the Parliament
Please make it a big successSent through… pic.twitter.com/XYeUXgUxJH
— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 19, 2026
त्यांच्या पत्नीमार्फत बाहेर आलेल्या हस्तलिखित संदेशाने आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडियावर हा संदेश प्रसिद्ध केला असून, काही तासांतच तो देशभर चर्चेचा विषय ठरला.
वांगचुक यांनी आपल्या संदेशात लिहिले आहे, “२० जुलै… स्वातंत्र्यासाठी दुसरे आंदोलन… भयमुक्त भारत आणि अन्यायमुक्त भारत. पेपरफुटीसारख्या अन्यायापासून स्वातंत्र्य आणि बेकायदेशीर अटकेच्या भीतीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संसदेकडे चला. ही भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ आहे. लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा.”
Message from Sonam Sir:
20th JULY
आज़ादी का दूसरा आन्दोलन
भय मुक्त भारत, अन्याय मुक्त भारतFreedom from injustice (Like paper leaks)
Freedom from Fear (my illegal detention)India’s 2nd FREEDOM MOVEMENT
March to the Parliament
Please make it a big successSent through… pic.twitter.com/mdNqLiCA23
— Cockroach is Back (@Cockroachisback) July 19, 2026
या एका संदेशाने आंदोलनकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, दिल्लीसह विविध राज्यांमधून नागरिकांना संसद मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पत्नीचा संताप; ‘सरकारी रुग्णालयावर विश्वास उरला नाही’
दरम्यान, वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी सफदरजंग रुग्णालयाच्या उपचार प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून आवश्यक माहिती दिली जात नसल्याचा आरोप करत त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत वांगचुक यांना खाजगी रुग्णालयात हलविण्याची परवानगी मागितली आहे.
त्यांच्या या भूमिकेमुळे आंदोलनाला आणखी एक संवेदनशील वळण मिळाले आहे.
रुग्णालयाचा खुलासा; ‘प्रकृती स्थिर, पण धोका टळलेला नाही’
सफदरजंग रुग्णालयाने रविवारी सकाळी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची तीव्र कमतरता, अशक्तपणा आणि इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक चोवीस तास लक्ष ठेवून आहे. एम्समधील वरिष्ठ डॉक्टरांनाही उपचार प्रक्रियेत सहभागी करण्यात आले आहे.
रुग्णालयाने आवश्यक वैद्यकीय उपचारांची शिफारस केली असली, तरी त्या उपचारांबाबत कुटुंबीयांकडून अद्याप संमती मिळालेली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
‘आंदोलन थांबणार नाही’
वांगचुक यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले आहे की, रुग्णालयात दाखल असले तरी त्यांनी उपोषण मागे घेतलेले नाही. उलट, २० जुलैचा संसद मोर्चा अधिक मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
दरम्यान, या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, युवक, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रातील नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. सोशल मीडियावरही या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू असून, सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
उद्याच्या मोर्च्याकडे देशाचे लक्ष
रुग्णालयातून आलेल्या या संदेशामुळे आज होणाऱ्या संसद मोर्चाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले आहे. सरकारची पुढील भूमिका काय असेल, आंदोलनकर्त्यांची रणनीती काय असेल आणि या संघर्षाचे राजकीय पडसाद किती दूरवर उमटतील, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दिल्लीतील घडामोडींनी राष्ट्रीय राजकारणात नवा संघर्ष पेटण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.


