मुंबई प्रतिनिधी
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम भारतातील इंधन दरांवर दिसू लागला असून घरगुती तसेच व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) शनिवारी (७ मार्च) घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांची वाढ जाहीर केली. नवीन दर तात्काळ लागू झाले असून या निर्णयामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे स्वयंपाकघराचे बजेट तसेच हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसायावर अतिरिक्त आर्थिक ताण पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इंडियन ऑइलच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, १४.२ किलोच्या विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत मुंबईत आता ९१२.५० रुपये झाली आहे. यापूर्वी हा सिलिंडर ८५२.५० रुपयांना उपलब्ध होता. गेल्या वर्षभरात सिलिंडर दरात झालेली ही दुसरी मोठी वाढ मानली जात आहे.
दरम्यान, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. या सिलिंडरची किंमत ११५ रुपयांनी वाढून मुंबईत आता ती १,८३५ रुपयांवर पोहोचली आहे. याआधी हा सिलिंडर १,७२०.५० रुपयांना उपलब्ध होता. या वाढीचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅटरिंग सेवा तसेच लहान खाद्यव्यवसायांवर होणार असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
उज्ज्वला योजनेचा दिलासा कायम
दरवाढ असूनही केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान कायम ठेवण्यात आले आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी १२ रिफिलपर्यंत प्रति १४.२ किलो सिलिंडरमागे ३०० रुपयांचे अनुदान मिळत राहणार आहे. सध्या देशातील १० कोटींहून अधिक कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
वर्षभरानंतर घरगुती सिलिंडर महाग
एप्रिल २०२५ नंतर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत प्रथमच मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांबरोबरच एलपीजीवर अवलंबून असलेल्या छोट्या व्यावसायिकांना देखील दरवाढीचा फटका बसणार आहे.
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील तेल वाहतूक मार्गांवर संभाव्य अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर एलपीजी दरवाढ करण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
ऊर्जा पुरवठ्याबाबत सरकारची हमी
दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी देशातील ऊर्जा पुरवठ्याबाबत नागरिकांना आश्वस्त केले आहे. भारतात ऊर्जा टंचाईची भीती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“आमच्या नागरिकांना परवडणारे आणि शाश्वत इंधन उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्राधान्य आहे. भारतात ऊर्जा पुरवठ्याची कोणतीही कमतरता नाही आणि ग्राहकांनी काळजी करण्याचे कारण नाही,” असे पुरी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरवाढीमुळे आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात आणखी वाढ होणार असून पुढील काळात इंधन दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.


