मुंबई प्रतिनिधी
राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एका जागेसाठी महाविकास आघाडीकडून अखेर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीने उमेदवार जाहीर केल्यानंतर आघाडीत या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेरीस भाजपकडून अप्रत्यक्ष दबावतंत्र राबवले गेल्याच्या पार्श्वभूमीवर आघाडीने पवार यांच्या नावावर एकमत साधल्याचे सांगितले जात आहे.
राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही तास शिल्लक असतानाही आघाडीतील घटक पक्षांमध्ये एकमत होत नसल्याचे चित्र होते. शरद पवार हे इच्छुक असले तरी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही जागा स्वतः लढवण्याच्या भूमिकेत असल्याचे संकेत देत होती. दुसरीकडे काँग्रेसने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी थेट दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे आघाडीत मतैक्य नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र सुरुवातीपासूनच शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी “ही जागा शिवसेनाच लढवेल” अशी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. देशभरात पक्षाचा आवाज पोहोचवण्यासाठी ही जागा महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे पवार यांच्या नावाबाबत शिवसेनेत पूर्ण सहमती नसल्याचे चित्र निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर भाजपने राजकीय दबावाची रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. शरद पवार उमेदवार नसतील तर राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार नाही आणि पाचवा उमेदवार देण्याचा पर्याय खुला ठेवला जाईल, असे संकेत भाजपकडून दिले गेले होते. यामुळे आघाडीतील समीकरणे बदलली आणि अखेरीस पवार यांच्या नावावर एकमत साधण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
२०२२ मधील राज्यसभा निवडणुकीत भाजपने अतिरिक्त उमेदवार देत आघाडीला धक्का दिला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपच्या राजकीय हालचालींचा विचार करून आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांच्या नावावर जवळपास अंतिम निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही निवड आघाडीची ताकद की भाजपच्या दबावाची परिणती, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


