पुणे प्रतिनिधी
राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागात धडक कारवायांमुळे सातत्याने चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरले. त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर आधारित ‘तुकाराम’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी अवघ्या दोन मिनिटांचे, पण अत्यंत प्रेरणादायी भाषण करत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या भाषणाला सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
पूर्वीच्या काळी लोकांना तुकाराम कळाले नाही, कलयुगात समजलंय जनतेला याचा जास्त आनंद आहे. त्यांनी गाथा लिहिली ती अजरामर झाली, यांनी पुस्तक लिहिलं याने समाज घडेल ❣️ pic.twitter.com/vBsjPVPxGR
— निसर्गराजा (@shetakriraja288) July 18, 2026
पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते ‘तुकाराम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि तुकाराम मुंढे यांचे चाहते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. साधेपणा, स्पष्टवक्तेपणा आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंढे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
सध्या अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाची औषधे, नियमांचे उल्लंघन करणारी हॉटेल्स, दुकाने आणि उत्पादकांवर सातत्याने कठोर कारवाई सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यशैलीची राज्यभर चर्चा होत असतानाच त्यांच्या संघर्षमय प्रवासावर आधारित पुस्तक प्रकाशित झाल्याने या सोहळ्याकडे विशेष लक्ष लागले होते.
“स्पर्धा परीक्षा अंतिम ध्येय नाही”
पुस्तक प्रकाशनानंतर बोलताना तुकाराम मुंढे यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत उपस्थितांना महत्त्वाचा संदेश दिला.
“आपण सर्वजण इथे आलात, याबद्दल मी मनापासून आभारी आहे. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. लोकसेवेसाठी माझ्या परीने जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे आम्ही करत राहू,” असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना उद्देशून अत्यंत मोलाचा संदेश दिला. “स्पर्धा परीक्षेतील यश हे अंतिम नाही. स्पर्धा परीक्षा हे केवळ एक माध्यम आहे. माझ्या मते स्पर्धा परीक्षेची प्रामाणिक तयारी करणारा विद्यार्थी कधीच अपयशी ठरत नाही,” असे त्यांनी सांगितले.
“स्वतःशी स्पर्धा करा”
स्पर्धा म्हणजे दुसऱ्याला हरवणे नव्हे, तर स्वतःला घडविण्याची प्रक्रिया असल्याचे सांगताना मुंढे म्हणाले, “स्पर्धा कधीही दुसऱ्याशी करायची नसते. स्वतःशी स्पर्धा करून आजपेक्षा उद्या अधिक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करणे, हीच खरी स्पर्धा आहे.”
त्यांच्या या विचारांना उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. अवघ्या दोन मिनिटांच्या भाषणात त्यांनी यश, व्यक्तिमत्त्व विकास आणि लोकसेवेचा मूलमंत्र मांडल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
संघर्षातून उभा राहिलेला प्रवास
‘तुकाराम’ या पुस्तकामध्ये ग्रामीण भागातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत प्रशासकीय सेवेत दाखल झालेल्या तुकाराम मुंढे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा मागोवा घेण्यात आला आहे. प्रशासनातील विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी घेतलेले कठोर निर्णय, पारदर्शक कारभार, नियमांप्रती असलेली निष्ठा आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी भूमिका याचाही पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे.
अलीकडच्या काळात अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत सुरू असलेल्या धडक मोहिमांमुळे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. अशा पार्श्वभूमीवर झालेला हा पुस्तक प्रकाशन सोहळा आणि त्यामधील त्यांचे प्रेरणादायी विचार उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरले. त्यांच्या भाषणातील “स्पर्धा दुसऱ्याशी नाही, स्वतःशी करा” हा संदेश विशेषतः स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरल्याची प्रतिक्रिया कार्यक्रमानंतर अनेकांनी व्यक्त केली.


