पंढरपूर प्रतिनिधी
आषाढी व कार्तिकी वारीसह वर्षभर लाखो वारकरी आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर समितीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोठी पावले उचलली आहेत. मंदिर आणि परिसरातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या स्वरूपात मिळून एकूण 190 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, दोन स्वतंत्र नियंत्रण कक्षातून २४ तास या यंत्रणेवर देखरेख ठेवली जाणार आहे.
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी ही माहिती देताना सांगितले की, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्री संत तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संपूर्ण दर्शन रांग, पत्रा शेड तसेच भाविकांची मोठी वर्दळ असलेल्या विविध ठिकाणी अत्याधुनिक आयपी, अनालॉग आणि मेगापिक्सेल नाईट व्हिजन क्षमतेचे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या माध्यमातून मंदिर परिसरातील प्रत्येक घडामोडीवर थेट नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
भाविकांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या लक्षात घेऊन मंदिर समितीने सुरक्षित आणि सुलभ दर्शनाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. दर्शन रांगेतील घुसखोरी रोखणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, गर्दीचे व्यवस्थापन करणे, आपत्कालीन आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध करून देणे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्वरित कारवाई करणे, या उद्देशाने ही यंत्रणा उभारण्यात आली आहे.
सीसीटीव्ही नियंत्रणासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि श्री संत तुकाराम भवन येथे दोन स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. या नियंत्रण कक्षांमधून प्रशिक्षित ऑपरेटर २४ तास कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवणार आहेत. राजेंद्र घागरे, अनंता रोपळकर, योगेश साळुंखे आणि रघुनाथ शिंदे यांची पूर्णवेळ ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, या संपूर्ण यंत्रणेची जबाबदारी विभाग प्रमुख अमित नवाळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
कॅमेऱ्यांद्वारे दिसणाऱ्या प्रत्येक हालचालीची माहिती नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीच्या माध्यमातून सुरक्षा कर्मचारी, व्यवस्थापन आणि संबंधित विभागांपर्यंत तात्काळ पोहोचविली जाणार आहे. त्यामुळे एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काही क्षणांत आवश्यक ती मदत आणि उपाययोजना करता येणार आहेत.
विशेष म्हणजे, या संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणेचा थेट अॅक्सेस कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकांच्या कार्यालयातही उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यालयातूनच मंदिर परिसरातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
मंदिर व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी सांगितले की, वारकरी आणि भाविक यांनाच केंद्रस्थानी ठेवून ज्या ठिकाणी सीसीटीव्हीची आवश्यकता होती, त्या सर्व ठिकाणी अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे सर्व दिशांनी परिसराचे निरीक्षण करत असल्याने कोणताही भाग त्यांच्या नजरेतून सुटत नाही. तसेच कॅमेऱ्यांमधील चित्रफीत सुरक्षितरीत्या साठविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे, ज्यामुळे गरज पडल्यास तपासासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
मंदिर समितीच्या या उपक्रमामुळे पंढरपूरला दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेला अधिक बळ मिळणार असून, गर्दीच्या काळातही शिस्तबद्ध आणि सुरक्षित दर्शन व्यवस्था राखण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास मंदिर प्रशासनाने व्यक्त केला आहे.


