आंबेगाव प्रतिनिधी
दुर्गम आदिवासी भागातील एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील तरुणाने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस सेवेतील उपपोलीस अधीक्षक (डीवायएसपी) पदापर्यंत मजल मारत ग्रामीण भागातील युवकांसमोर प्रेरणेचा आदर्श निर्माण केला आहे. आंबेगाव तालुक्यातील जांभोरी गावचे राहुल हनुमंत केंगले यांची प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लातूर येथे उपपोलीस अधीक्षक म्हणून प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राहुल केंगले यांचे वडील हनुमंतराव केंगले आणि आई सुनंदा केंगले हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या अत्यंत मर्यादित उत्पन्नातून संसाराचा गाडा ओढत असतानाही त्यांनी मुलाच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही. आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी राहुल यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवत राहुल यांनीही शिक्षणात सातत्य राखले आणि अखेर आपल्या मेहनतीचे सोनं केले.
राहुल यांचे प्राथमिक शिक्षण जांभोरी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर गुणवत्तेच्या जोरावर त्यांची सांगली येथील जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली. तेथे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सांगली येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
सन २०२१ मध्ये त्यांनी प्रथमच उपपोलीस अधीक्षक पदासाठी एमपीएससी परीक्षा दिली. मात्र, पहिल्याच प्रयत्नात अपेक्षित यश मिळाले नाही. अनेक जण अपयशानंतर स्वप्ने अर्धवट सोडून देतात; परंतु राहुल यांनी अपयशाला पराभव न मानता त्यातून शिकण्याची संधी म्हणून स्वीकारले. स्वतःच्या चुका शोधून त्यांनी अधिक नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास सुरू केला. दिवस-रात्र मेहनत घेत स्वतःला अधिक सक्षम बनविले आणि पुन्हा नव्या जोमाने परीक्षेला सामोरे गेले.
या अथक प्रयत्नांचे फळ त्यांना सन २०२२ मध्ये मिळाले. एमपीएससीच्या लेखी आणि तोंडी परीक्षेत त्यांनी उल्लेखनीय यश मिळवत उपपोलीस अधीक्षक पदासाठी निवड निश्चित केली. त्यानंतर त्यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. कठोर शारीरिक, बौद्धिक आणि प्रशासकीय प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर आता त्यांची लातूर येथे उपपोलीस अधीक्षक म्हणून प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे अप्पर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिकचे संचालक यांना पाठविलेल्या आदेशानुसार राहुल केंगले यांचा प्रशिक्षण कालावधी २३ जुलै रोजी पूर्ण होत असून त्यानंतर त्यांना लातूर येथे प्रत्यक्ष सेवेसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राहुल यांच्या नियुक्तीची बातमी जांभोरीसह संपूर्ण आंबेगाव तालुक्यात पोहोचताच ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. दुर्गम आदिवासी गावातून राज्य पोलीस सेवेत अधिकारी होण्याचा मान मिळाल्याने गावाचा नावलौकिक वाढला असून, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.
राहुल यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचा त्याग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची अविरत मेहनत हे महत्त्वाचे घटक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाच्या बळावर मोठे यश मिळविता येते, याचे राहुल केंगले हे जिवंत उदाहरण असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले.
‘अपयशाने खचू नका; प्रयत्न सुरू ठेवा’
यशानंतर बोलताना राहुल केंगले म्हणाले, “लहानपणापासूनच माझ्या आई-वडिलांची इच्छा होती की, मी पोलीस दलात अधिकारी व्हावे. त्यामुळे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच एमपीएससीची तयारी सुरू केली. २०२१ मध्ये पहिल्या प्रयत्नात अपयश आले; मात्र मी निराश झालो नाही. चुका शोधून त्यावर काम केले आणि अधिक मेहनत घेतली. २०२२ मध्ये लेखी व तोंडी परीक्षा उत्तीर्ण झालो. प्रामाणिक प्रयत्न, सातत्य आणि आत्मविश्वास असेल तर यश निश्चित मिळते. या यशामागे माझे आई-वडील हनुमंतराव आणि सुनंदा केंगले यांचे प्रेम, त्याग आणि प्रोत्साहन हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न करत राहावे.”
राहुल केंगले यांच्या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते. जांभोरीसारख्या दुर्गम आदिवासी गावातून राज्य पोलीस सेवेत अधिकारी घडल्याने संपूर्ण परिसरासाठी हा अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण ठरला आहे.


