संभाजीनगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा परिसरातील सावित्रीनगर येथील एका शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षेच्या नावाखाली अमानवी वागणूक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे केस रबरने बांधून त्यांना शाळेच्या मैदानात उभे केल्याचे समोर आले असून या घटनेचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालकवर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शाळेतील काही विद्यार्थ्यांना शिस्तभंगाच्या कारणावरून सर्वांसमोर अशा प्रकारे शिक्षा देण्यात आल्याचा आरोप आहे. यावेळी मुख्याध्यापकांनी केलेले कथित अवमानकारक वक्तव्यही चर्चेत आले आहे. “आज केस बांधले, उद्यापासून लिपस्टिक लावू आणि बांगड्या घालायला लावू,” असे वक्तव्य केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या घटनेमुळे संबंधित विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रकरणाचे छायाचित्रे समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्यानंतर शिक्षण विभागाने दखल घेतली. शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. मनपा शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे, कनिष्ठ लिपिक आर. बी. कोलते आणि विशेष शिक्षक गणेश लक्कस यांच्या समितीने शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांनी समितीसमोर घडलेला प्रकार मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत शाळा व्यवस्थापनाकडून गंभीर त्रुटी झाल्याचे नमूद करण्यात आले असून संबंधित शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्याची तयारी सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पालक, नागरिक आणि सामाजिक संघटनांत संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अशा शिक्षापद्धतींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शिक्षण क्षेत्रात संवेदनशीलतेची गरज अधोरेखित करणारी ही घटना ठरत आहे.


