संभाजीनगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दूध व्यवसायातील मोठ्या भेसळीचा पर्दाफाश करत अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईत तब्बल ३,५०० लिटर भेसळयुक्त दूध आणि सुमारे ५०० किलो व्हे परमिएट (गोवर्धन) दूध पावडर जप्त केली. कारवाईदरम्यान सुमारे १ लाख ३२ हजार रुपयांचे संशयित दूध जागेवरच नष्ट करण्यात आले असून, या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दूध भेसळीच्या मोठ्या साखळीचा पर्दाफाश झाला असून मराठवाड्यासह गुजरातपर्यंत या दुधाचा पुरवठा होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत सुरेश अजिंठेकर यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बुधवारी (ता. ८) दुपारी लहान्याची वाडी, पाल फाटा परिसरातील सिद्धेश्वराय दूध संकलन केंद्रावर एफडीए आणि पोलिसांनी संयुक्त छापा टाकला. तपासादरम्यान दुधामध्ये व्हे पावडरसह अन्य हानिकारक पदार्थ मिसळून भेसळ केली जात असल्याचे उघड झाले.
या प्रकरणी योगेश कैलास लहाने, राजेंद्र ऊर्फ योगेश दौलत जाधव (दोघे रा. फुलंब्री) आणि श्रीनिवास ओमप्रकाश चव्हाण (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले भेसळयुक्त दूध आणि दूध पावडरचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
मराठवाड्यासह गुजरातपर्यंत पोहोचत होते भेसळयुक्त दूध
एफडीएच्या तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली. सिद्धेश्वराय डेअरीमधून हे भेसळयुक्त दूध फुलंब्रीतील शिवकृपा दूध डेअरीला पुरवले जात होते. त्यानंतर शिवकृपा डेअरीवरही छापा टाकण्यात आला असता तेथेही अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. परिणामी प्रशासनाने सिद्धेश्वराय आणि शिवकृपा या दोन्ही डेअरींना सील केले.
तपासादरम्यान शिवकृपा डेअरीमधून हे दूध पुढे मराठवाडा मिल्क प्रोड्युसर कंपनी (केअर ऑफ एम/एस. सोनाई डेअरी, इंदापूर) तसेच गुजरातमधील पंचमहल दूध उत्पादक सहकारी संघाकडे पुरवले जात असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती राज्याबाहेरपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले असून, संबंधित पुरवठा साखळीचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दूध भेसळीविरोधात एफडीएचा इशारा
एफडीएने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे दूध भेसळीच्या व्यवसायात गुंतलेल्या घटकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत आणखी धडक कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


