नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशातील वैद्यकीय शिक्षणासाठीची सर्वात महत्त्वाची प्रवेश परीक्षा असलेल्या NEET-UG 2026 चा निकाल गुरुवारी रात्री नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जाहीर केला. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर फेरपरीक्षा घेण्यात आल्यानंतर अखेर निकाल जाहीर झाला असून, एकूण ११.२५ लाख उमेदवार पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे, देशातील अव्वल १७ गुणवंतांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय स्थान मिळवत राज्याचा मान उंचावला आहे.
The National Testing Agency (NTA) today declared the result of the National Eligibility cum Entrance Test (Undergraduate), NEET (UG) 2026. The result has been declared in time so that the medical-admission and counselling calendar for candidates stays on track.
A total of close… pic.twitter.com/ER4btyZWOR
— ANI (@ANI) July 16, 2026
यंदाच्या परीक्षेत पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पंशुल बन्सल यांनी ७२० पैकी ७१५ गुण मिळवत संयुक्तपणे देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशभरातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले आहेत.
पेपरफुटीनंतर २१ जूनला झाली फेरपरीक्षा
यंदाची नीट परीक्षा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. ३ मे २०२६ रोजी झालेल्या मूळ परीक्षेनंतर पेपरफुटीचे आरोप समोर आल्यानंतर केंद्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २१ जून २०२६ रोजी देशभरात एकाच सत्रात फेरपरीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेला २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. भारतातील ५,४४० परीक्षा केंद्रांबरोबरच १४ परदेशी केंद्रांवरही परीक्षा पार पडली. परीक्षेची गोपनीयता आणि सुरक्षा अबाधित राहावी यासाठी केंद्र सरकारने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली होती. आवश्यक ठिकाणी लष्कराचीही मदत घेण्यात आली.
निकालातील ठळक आकडेवारी
एनटीएने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.
एकूण पात्र उमेदवार : ११.२५ लाख
पात्र उमेदवारांमध्ये ५८ टक्क्यांहून अधिक विद्यार्थिनी
१,४९२ विद्यार्थ्यांनी ६५० किंवा त्याहून अधिक गुण
१०,१६० विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा अधिक गुण
९०,७८० विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा अधिक गुण
६९० पेक्षा अधिक गुण मिळवणारे १३८ विद्यार्थी
यापैकी ९३ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.
राज्यनिहाय अव्वल विद्यार्थ्यांमध्ये लडाखच्या जिग्मेट यांगचान लामो (५३० गुण), अंदमान-निकोबारच्या ध्रुव त्रिपाठी (६०६ गुण) आणि लक्षद्वीपच्या फाहमिदा अनीस (५७३ गुण) यांचा समावेश आहे.
देशातील ७०५ किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या १७ विद्यार्थ्यांमध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, तमिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांतील विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे.
महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
यंदाच्या नीट परीक्षेत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. त्यामध्ये खालील विद्यार्थ्यांचा समावेश आहे –
१ अतुल्या बाळासाहेब डोंगरे
२ श्रावणी कृष्णा कुदळे
३ मोहनीश मारुती भोसले
४ सार्थक महेश पाटील
५ सानिध्य क्षितिज डोंगरे
६ अर्णव लाहोटी
७ प्रणव पुरणलाल टेम्भूर्णे
८ रौशमीत गुप्ता
९ सोहम निशिकांत पाटील
१० सागर राजेश करीकर
११ सौम्या बदोले
१२ अनुश्री अजय थोरात
१३ आर्या अभिजित दिवेकर
१४ सहिम सादिक पटवेगार
१५ सुहाना सलीम शेख
१६ अमीर वरावल्लाह
१७ सार्थक पेठकर
१८ श्रीवल्लभ विष्णुपंत गावडे
या विद्यार्थ्यांच्या यशामुळे राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
निकाल कसा पाहावा?
नीट परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात.
निकाल पाहण्याची प्रक्रिया:
अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
होमपेजवरील ‘NEET UG 2026 Result’ या लिंकवर क्लिक करा.
अर्ज क्रमांक, जन्मतारीख किंवा आवश्यक लॉगिन तपशील भरा.
‘Submit’ वर क्लिक केल्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्कोअरकार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवावी.
एनटीएने उमेदवारांच्या ओएमआर उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत आणि स्कोअरकार्ड डिजीलॉकरमध्ये उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात प्रवेश प्रक्रियेदरम्यान आवश्यक कागदपत्रे सहज उपलब्ध होणार आहेत.
समुपदेशन प्रक्रियेला लवकरच सुरुवात
निकाल जाहीर झाल्यानंतर आता देशभरातील एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशन (Counselling) प्रक्रिया सुरू होणार आहे. केंद्रीय तसेच राज्यस्तरीय समुपदेशनाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणार आहे.
पेपरफुटीच्या मोठ्या वादानंतर पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घेऊन वेळेत निकाल जाहीर करण्याचे आव्हान एनटीएने पूर्ण केले आहे. आता लाखो विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणाचा पुढील टप्पा असलेल्या प्रवेश प्रक्रियेकडे देशाचे लक्ष लागले आहे.


