संभाजीनगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या अंतर्गत वादातून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची घटना बायजीपुरा परिसरात घडली. प्रचार पदयात्रेदरम्यान पक्षाच्या दोन गटांतील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
इम्तियाज जलील यांची सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. मात्र या पदयात्रेला सुरुवातीपासूनच पक्षातील नाराज कार्यकर्त्यांचा विरोध होता. बायजीपुरा परिसरात पदयात्रा पोहोचताच नाराजी उघडपणे समोर आली. काही कार्यकर्त्यांनी जलील यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर जलील यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी समर्थक आणि नाराज कार्यकर्ते आमनेसामने आले आणि काही क्षणांतच परिस्थिती हाताबाहेर गेली.
याच गोंधळात जलील यांची थार गाडी मार्गक्रमण करत असताना नाराज कार्यकर्त्यांनी वाहनावर हल्ला चढवला. हल्ल्याच्या वेळी इम्तियाज जलील हे गाडीच्या पुढील सीटवर बसले होते. वाहनावर दगडफेक व हाताने मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने या घटनेत जलील यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या गाडीत असलेल्या एका कार्यकर्त्याच्या डोळ्याला जखम झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी घेतली.
या घटनेनंतर आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे उमेदवार करीम कुरेशी यांनी हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप केला आहे. मात्र कुरेशी यांनी हे आरोप फेटाळून लावत, “आमच्या भागात अरेरावीची भाषा वापरण्यात आली. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटली,” असे स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएमने छत्रपती संभाजीनगरमध्ये २२ माजी नगरसेवकांची तिकिटे कापून नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच पक्षात असंतोषाचे सूर उमटत होते. सोमवारी घडलेली घटना ही त्याच नाराजीचे तीव्र प्रतिबिंब असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून कडक पावले उचलली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.


