संभाजीनगर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच अपयशाच्या भीतीने दहावीच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुंडलिक नगर परिसरात घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यांवरील वाढत्या मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोहम ज्ञानेश्वर मोरे (वय १७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो छत्रपती संभाजीनगरातील पुंडलिक नगर, गल्ली क्रमांक १० येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. सोहम यंदा दहावीच्या परीक्षेला बसला होता आणि शुक्रवारी त्याचा निकाल जाहीर होणार होता. मात्र, परीक्षेत अपेक्षित यश मिळणार नाही आणि आपण नापास होऊ, या भीतीने तो प्रचंड तणावाखाली होता.
याच मानसिक दबावातून सोहमने शुक्रवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. कुटुंबीयांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर एकच आक्रोश पसरला. तातडीने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे.
सोहमच्या अचानक जाण्याने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातही शोककळा पसरली असून, शेजारी आणि नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली. एका निकालाच्या भीतीने एका उमलत्या आयुष्याचा अंत झाल्याने नागरिकांनीही चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, या घटनेने विद्यार्थ्यांवर वाढत चाललेल्या शैक्षणिक आणि मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. परीक्षेतील यश-अपयश हे आयुष्याचे अंतिम सत्य नसतानाही अनेक विद्यार्थी गुणांच्या दडपणाखाली मानसिकदृष्ट्या खचत असल्याचे वास्तव या घटनेतून समोर आले आहे.
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, पालक, शिक्षक आणि समाजाने विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांच्यावर अवास्तव अपेक्षांचे ओझे न टाकणे आणि अपयशाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची मानसिक तयारी करून देणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा अशा दुर्दैवी घटना रोखणे कठीण होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


