संभाजीनगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी (वर्ग-१) साधना सदाशिवराव बांगर आणि कंत्राटी लिपिक पठाण मुजीब खान यासीन खान यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराने डिसेंबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीत प्राधिकरणाला भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करून दिली होती. या कामाचे एकूण १३ लाख ३४ हजार ८५१ रुपयांचे बिल झाले होते. त्यापैकी ३ लाख २४ हजार ८४० रुपयांचे बिल प्रलंबित होते. हे बिल मंजूर करण्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी साधना बांगर यांनी बिलाच्या पाच टक्के रक्कमेप्रमाणे २० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर जालना एसीबीने अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचला. या कारवाईत पोलीस निरीक्षक कोमल शिंदे या सापळा राबविण्यापूर्वी जवळपास अर्धा तास कार्यालयातील स्वच्छतागृहात दबा धरून बसल्या होत्या. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने २० हजार रुपयांची रक्कम कंत्राटी लिपिक पठाण याच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर पूर्वनियोजित संकेत म्हणून तक्रारदाराने शर्टची बाही वर केली. हा इशारा मिळताच निरीक्षक शिंदे आणि साध्या वेशातील एसीबीच्या पथकाने तातडीने धाव घेत दोन्ही आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान साधना बांगर यांच्या ताब्यातून मोबाईल फोन, टॅब आणि पेनड्राइव्ह जप्त करण्यात आला असून, या उपकरणांची तपासणी करण्यात येणार आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, लाचखोरीच्या या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.


