
स्वप्नील गाडे|प्रतिनिधी
मुंबई|मीरा रोड, दि. ७ जून – काशिगाव पोलिसांनी बनावट चलन प्रकरणात मोठी कारवाई करत ५०० रुपयांच्या २१६ बनावट नोटांसह दोन व्यक्तींना अटक केली. ही कारवाई विनय नगर, मीरा रोड परिसरात करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी सूपर्णा मन्ना आणि सूर्यदेव गायेन हे दोघेही पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत.
काशिगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दोघेजण बनावट नोटा घेऊन विनय नगर परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणी आरोपी आल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले. झडती दरम्यान त्यांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या एकूण २१६ बनावट नोटा मिळून आल्या असून, त्यांची किंमत १ लाख ८ हजार रुपये इतकी आहे.
ही कारवाई काशिगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश टोगरवार यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विजय माराठे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
आरोपींचा आणखी कोणत्या मोठ्या टोळीशी संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास काशिगाव पोलीस करत आहेत.