स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : खार पूर्व परिसरात ९ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी मनुवर गेणू मलिक (वय ५२) याला विशेष सत्र न्यायालयाने वीस वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास दोन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.
१८ डिसेंबर २०२२ रोजी शिवालीक कंपाउंड झोपडपट्टी परिसरात ही घटना घडली होती. घराबाहेर खेळत असताना पीडित मुलगी शेजाऱ्याच्या घरी गेली. त्या वेळी आरोपीने घराला आतून कडी लावून तिच्यावर अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. घरी परतल्यानंतर मुलीने आईला प्रकार सांगितल्यानंतर निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक एस. टी. चव्हाण यांनी केला. पीडित मुलगी, प्रत्यक्षदर्शी आणि अन्य साक्षीदारांचे जबाब नोंदवून न्यायालयात ठोस पुरावे सादर करण्यात आले. सर्व पुरावे ग्राह्य धरत विशेष सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बी. एस. गरे यांनी आरोपीस दोषी ठरवले.
सुनावणीदरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश वाघ आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज खाडे यांनी प्रकरणावर सातत्याने लक्ष ठेवले. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक संदिप जरांडे, पोलीस हवालदार प्रदीप आगवणे, गुन्हे मदतनीस श्रीकृष्ण सावळे, कोर्ट कारकून धर्मेन्द्र धनु, महिला पोलीस शिपाई कल्पना जाधव आणि पोलीस शिपाई प्रीतम कांबळे यांचा समावेश होता.


