
स्वप्नील गाडे|प्रतिनिधी
मुंबई|विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अचूक माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे वाहन चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करत तब्बल तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीकडून एकूण सुमारे १.७० लाख रुपये किमतीची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई दि. २८ मे २०२५ रोजी दाखल झालेल्या एका तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आली. दिपक कुमार साहू (वय २२), हे रिक्षाचालक असून त्यांनी त्यांच्या मालकीची अॅटोरिक्षा कुर्ला पश्चिमेतील एचडीआयएल परिसरातील बिल्डिंग क्रमांक १० समोरील जागेत पार्क केली होती. रात्री ९ ते १० दरम्यान अज्ञात चोरट्याने सदर ऑटो रिक्षा चोरून नेल्याची तक्रार त्यांनी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या प्रकरणी गु.र.क्र. ३१९/२०२५ नुसार कलम ३७९ भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस उपायुक्त (परिमंडळ ५) माहीम, सहाय्यक पोलीस आयुक्त (कुर्ला विभाग) तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तपासाच्या दरम्यान गोपनीय माहितीदार आणि तांत्रिक पद्धतीच्या सहाय्याने गुन्हे शाखेने मोहम्मद सगीर अब्दुल मजीद सिद्दिकी उर्फ मॅगी (वय २७) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी गेलेली ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आली.
पोलिसांनी अधिक तपास करत आरोपीकडून आणखी दोन मोटारसायकल्स देखील हस्तगत केल्या आहेत. आरोपीकडून एकूण तीन प्रकरणे उघडकीस आणत पोलिसांनी १,७०,००० रुपयांची चोरीची वाहने जप्त केली आहेत. सदर आरोपीविरोधात यापूर्वी देखील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर आयुक्त विक्रम देशमाने, उपायुक्त गणेश गावडे, सहायक आयुक्त (कुर्ला विभाग) तसेच वरिष्ठ निरीक्षक रविंद्र श्रीरसागर, निरीक्षक शिवानंद देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोउपनि. अमर चेडे, पो.ह. गांगुर्डे, गवारे, पो.शि. सांगळे, महाजन, विशे, उगले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.