सांगली प्रतिनिधी
मिरजजवळ उसाच्या शेतात सडलेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या एका रेल्वे तिकिटाच्या आधारे सांगली पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत खुनाचा गुंता उलगडत उत्तर प्रदेशातून बाप–लेकांना अटक केली. कोणतेही ठोस धागेदोरे नसताना केवळ तांत्रिक तपास आणि सूक्ष्म निरीक्षणाच्या जोरावर हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तपास पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
मिरजेपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या टाकळी गावाच्या हद्दीतील उसाच्या शेतात २३ डिसेंबर रोजी एका महिलेचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला होता. चेहरा व छातीचा भाग प्राण्यांनी फस्त केल्याने मृतदेहाची ओळख पटविणे कठीण झाले होते. परिसरात कोणतीही महिला बेपत्ता असल्याची नोंद नव्हती. मृत महिलेचा पेहरावही स्थानिक वाटत नसल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला होता.
दरम्यान, मृतदेहाजवळ पुणे–मिरज मार्गावरील रेल्वे तिकीट आढळून आले. या एकमेव धाग्याच्या आधारे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्त तपास सुरू केला. पुणे आणि मिरज रेल्वे स्थानकांवर चौकशी केल्यानंतर या तिघांना टाकळीजवळ उतरवणारा रिक्षाचालक पोलिसांच्या हाती लागला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधितांकडे पैसे संपल्याने त्यांनी एका चिक्की विक्रेत्याच्या माध्यमातून ऑनलाईन तीन हजार रुपये घेतले होते. या व्यवहाराच्या आधारे तांत्रिक तपास करत पोलिस संशयितांपर्यंत पोहोचले.
तपासात मृत महिलेचे नाव नितू ऊर्फ शालिनी आकाश यादव असे असल्याचे निष्पन्न झाले. तिने पती व सासरच्या लोकांविरुद्ध यापूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवर तडजोड झाल्यानंतर ती पुन्हा पतीकडे नांदण्यास गेली होती. काही दिवसांनी पती आकाश ऊर्फ विशाल दीनदयाळ यादव (२४) आणि सासरे दीनदयाळ यादव (५५, दोघेही रा. खुज्झी, ठाणा चंदवक, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश) हे तिघे मिरजेत आले. पुढे रिक्षामधून जात असताना त्यांच्यात वाद झाल्याचेही रिक्षाचालकाने पोलिसांना सांगितले.
याच वादातून पती व सासऱ्याने महिलेच्या अंगावरील शाल वापरून गळा आवळत तिचा खून केला आणि मृतदेह उसाच्या शेतात टाकून दोघेही आपल्या गावी परतले, अशी कबुली तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


