कल्याण प्रतिनिधी
डोंबिवलीतील राजकीय वर्तुळात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना मनसेचे नेते राजू पाटील यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला. “मनसे माझा आत्मा आहे. माझी पक्षनिष्ठा पैसा, मैत्री किंवा दमबाजीने विकत घेता येत नाही,” असे ठाम मत व्यक्त करत आपण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांचे त्यांनी खंडन केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मनसेचे माजी शहराध्यक्ष ॲड. मनोज घरत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, “मनसेतील लहान भाऊ भाजपमध्ये आला असून लवकरच मोठा भाऊही येईल,” असे विधान चव्हाण यांनी केले होते. या वक्तव्यामुळे डोंबिवली-कल्याण परिसरात राजकीय संभ्रम निर्माण झाला होता. ‘मोठा भाऊ’ नेमका कोण, याबाबत तर्कांना उधाण आले असतानाच राजू पाटील यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.
राजू पाटील म्हणाले की, “मी मनसेचा निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षनिष्ठेबद्दल कोणालाही शंका घेण्याचे कारण नाही. मनसे माझ्या नसानसात आहे. त्यामुळे माझा कुठेही जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी आपली १९९४ पासूनची मैत्री असल्याचे नमूद करत पाटील म्हणाले, “रवींद्र चव्हाण यांचे अनेक मित्र आहेत. काही त्या काळात मोठे झाले, काहींचे दुर्दैवाने एन्काऊंटरही झाले. त्यामुळे ‘मोठा भाऊ’ हा उल्लेख नेमका कोणासाठी आहे, याची मला कल्पना नाही. ज्या दिवशी ते माझे नाव घेऊन स्पष्ट बोलतील, त्या दिवशी मीही त्यांना माझ्या शब्दांत उत्तर देईन.”
आपणच तो ‘मोठा भाऊ’ असल्याचा दावा त्यांनी ठामपणे फेटाळून लावला.
दरम्यान, डोंबिवलीतील अलीकडील हिंसक घटनेवरही पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “डोंबिवलीत पालिका, लोकसभा, विधानसभा अशा अनेक निवडणुका झाल्या. मात्र कधी रक्तरंजित राडे पाहायला मिळाले नाहीत. सुनीलनगर भागात युतीतील दोन पक्षांमध्ये पैसे वाटपाच्या वादातून जीवघेणा हल्ला होणे ही सुसंस्कृत डोंबिवलीला न शोभणारी घटना आहे,” असे ते म्हणाले.
या पार्श्वभूमीवर नागरिकांना जागृत होण्याचे आवाहन करत पाटील म्हणाले, “अशा विखारी प्रवृत्ती रोखायच्या असतील तर लोकांनीच रस्त्यावर उतरले पाहिजे. जागृत नागरिकांनी मतदान केल्यास अशा प्रवृत्तींना आळा घालणे निश्चितच शक्य होईल.”
राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात राजू पाटील यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे मनसेतील संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना तात्पुरता का होईना, पण पूर्णविराम मिळाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.


