सातारा प्रतिनिधी
सातारा नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना गेल्या दोन ते चार महिन्यांपासून पगार न मिळाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी थेट हस्तक्षेप केल्याने प्रशासन हालचालीत आले आहे. कामगारांचे वेतन तातडीने अदा करावे, तसेच नियमभंग करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.
नगरपालिकेत कार्यरत कंत्राटी कामगारांचे पगार अनेक महिने थकले असून, पगाराची मागणी केल्यास कामावरून काढण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप आहे. याशिवाय पीएफ भरणा, आरोग्य विमा यांसारख्या कायदेशीर सुविधा देण्यात येत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती जनरल कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी पाटील यांनी तात्काळ सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट आणि सहाय्यक कामगार आयुक्त कवले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ पगार न देणाऱ्या, तसेच करारनाम्यातील अटींचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारांचे ठेके रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच संबंधित कामगारांचे थकीत वेतन दोन दिवसांत त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
यावेळी रयत क्रांती जनरल कामगार संघटनेचे राज्यप्रमुख प्रा. गणेश वाघमारे, अनिल बेडकर, मीना साठे, सीमा जावळे, रेश्मा पवार, रंजना ढेबे, शुभांगी वायदडे, शोभा दळवी, सूरज वायदडे, महेश कांबळे, सुमन खवळे यांच्यासह मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार उपस्थित होते.
दरम्यान, प्रशासनाने आदेशांची अंमलबजावणी न केल्यास प्रजासत्ताक दिनी (दि. २६ जानेवारी) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानाबाहेर अन्नत्याग आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे नेते प्रा. गणेश वाघमारे यांनी दिला आहे. कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाकडे प्रशासन गांभीर्याने पाहते की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


