रायगड प्रतिनिधी
खोपोलीतील माजी नगरसेवक तथा शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात तपासाला मोठे वळण मिळाले असून, आरोपींनी २० लाख रुपयांची सुपारी घेऊनच ही हत्या केल्याची कबुली दिल्याने रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली असून, ही घटना कराराने (कॉन्ट्रॅक्ट किलिंग) करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
२६ डिसेंबर रोजी सकाळी मुलीला शाळेत सोडून घरी परतत असताना मंगेश काळोखे यांच्यावर सपासप वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण खोपोली परिसर हादरून गेला होता. सुरुवातीला वैयक्तिक वादाचा संशय व्यक्त करण्यात येत होता; मात्र तपास पुढे जात असताना हा खून सुपारी देऊन घडवून आणल्याचे स्पष्ट झाले.
रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळोखे यांना संपवण्यासाठी हल्लेखोरांनी तब्बल २० लाख रुपयांची सुपारी घेतली होती. या कटात अनेकांचा सहभाग असून, मुख्य सूत्रधारांनी पाच जणांना सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील दर्शन देवकर आणि महेश धायतड या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, हल्ल्यावेळी काळोखे यांच्या मुलींनाही लक्ष्य करण्याचा कट असल्याचा दावा त्यांच्या मुलींनी केला आहे. या दाव्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले असून, पोलिसांकडून त्या दिशेनेही तपास सुरू आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा या गुन्ह्यात थेट सहभाग आढळून आलेला नसल्याचे पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी स्पष्ट केले आहे. तथापि, सर्व बाजूंनी तपास सुरू असून तो अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंगेश काळोखे यांच्या हत्येला नऊ दिवस पूर्ण होत असतानाच सुपारीच्या रकमेसह कराराने हत्या झाल्याचा उलगडा झाल्याने, हा गुन्हा केवळ वैयक्तिक शत्रुत्वापुरता मर्यादित नसून संघटित कटाचा भाग असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील सर्व दुवे उघड होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.


