मुंबई प्रतिनिधी
“लाडकी बहिण” म्हणून निवडणुकीपूर्वी केलेली आश्वासने आता विसरली गेल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महिला आघाडीतर्फे आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. वांद्रे पूर्व येथील चैतना कॉलेजजवळून दुपारी ३:३० वाजता निघालेल्या या मोर्चाने महिलांच्या विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
“निवडणुकीपूर्वीची लाडकी बहीण, निवडणुकीनंतर झाली परकी बहीण!” अशा घोषणा देत शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. मोर्चामध्ये महिलांच्या हक्कांसाठी विविध मागण्या करण्यात आल्या:
लाडकी बहिण योजनेत महिना २१०० देण्याचे आश्वासन तातडीने पूर्ण करावे
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात
महिलांसाठी विशेष आरोग्य सुविधा व कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवाव्यात
वाढती महागाई नियंत्रणात आणावी
महिलांची फसवणूक थांबवण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात
या मोर्चाचे नेतृत्व आमदार वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांनी केले. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी, सुरज चव्हाण, अमोल कीर्तीकर, माजी नगरसेवक त्रिंबक सर, शेखर वायंगणकर, पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, रोहिणी कांबळे, विभाग प्रमुख उदय दळवी आणि अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुषमा अंधारे यांनी ठामपणे सांगितले की, “महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहील आणि सरकारला त्यासाठी जबाबदार ठरवले जाईल.”
या मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे गटाने महिला सशक्तीकरणाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद केला आहे.


